पुणे- सर्व बाबींची पूर्तता होऊनही गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून, त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केले आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी यासंदर्भात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे. मराठीच्या अभिजात दर्जासाठी परिषदेने केलेल्या प्रयत्नांची माहिती या निवेदनामध्ये देण्यात आली आहे.
साहित्य संस्थांनी आपले काम चोख केले असून, आता राजकीय नेत्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रा. जोशी म्हणाले, केंद्र सरकारच्या निकषांनुसार सर्व बाबींची पूर्तता होऊनही अजूनही आपण सारे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याची वाट पाहत आहोत. आता तर अभिजात दर्जासाठीचे निकष बदलले जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. तसे झाले तर नव्याने या विषयाचा श्रीगणेशा करावा लागेल. पण, महाराष्ट्राच्याच आणि मराठी माणसांच्याच बाबतीत असे का घडावे हे एक न उलगडणारे कोडे आहे. केवळ याच विषयासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन केवळ या प्रश्नासाठी दिल्लीत जाऊन पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांची भेट घेणे आवश्यक आहे. साहित्य संस्थांनी त्यांचे काम चोख केले आहे. आता राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येऊन लढा द्यायला हवा. आपण यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शरद पवार यांना करण्यात आली आहे.