पुणे- सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक मार्केट यार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे संपन्न झाली. याचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते झाले.
विदुषी प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक सांस्कृतिक आक्रमणे होत आहेत. अनावधानाने आपण ही त्याच्या अधीन जात आहोत. आपण भारतीय असल्याचे आपण विसरत आहोत. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या दृष्टिने संस्कार भारतीचे कार्य महत्त्वाचे आहे.’
शास्त्रीय कला केवळ मनोरंजन करण्यापुरत्या मर्यादित नसतात. जगात जे काही सुंदर, मंगल आणि शाश्वत आहे त्याची अनुभूती या कलांमधून होत असते. देशांच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या कलाकारांचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय महामंत्री डॉ. अश्विन दळवी, उपाध्यक्ष प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. मैसूर मंजुनाथ, उपाध्यक्षा डॉ. हेमलता मोहन उपस्थित होत्या. तसेच बौद्धिक प्रमुख स्वांतरंजन, संघटन मंत्री अभिजीत गोखले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतार वादक उस्ताद उस्मान खान, पुणे महानगराचे अध्यक्ष व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीला ज्येष्ठ सिने दिग्दर्शक व मार्गदर्शक राजदत्त, डॉ गो. बं. देगलूरकर, संघटन मंत्री अभिजित गोखले, डॉ रवींद्र भारती, नाट्य दिग्दर्शक प्रमोद पवार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी असे २४८ कलाकार कार्यकर्ते अखिल भारतातून उपस्थित होते.
या निमित्ताने पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तर ‘राष्ट्रभक्तिकी भागीरथी’ हा संघ गीतांवर आधारीत भरत नाट्यम आणि कथ्थक शैलीतील नृत्यरचनांमधून कार्यक्रम सादर करण्यात आला. नृत्यगुरु आस्था कार्लेकर, मैत्रेयी बापट, डॉ. स्वाती दैठणकर, अरुंधती पटवर्धन, डॉ. स्वाती दातार, सुवर्णा बाग आणि त्यांच्या शिष्यांनी नृत्य प्रस्तुती केली. याचे सूत्रसंचालन अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रांजली देशपांडे यांनी केले.
आगामी अखिल भारतीय कला साधक संगम बंगलोर येथे फेब्रुवारीमध्ये आयोजित केला आहे त्या संगमामागची संकल्पना, रचना आणि नियोजन याबाबतीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत बौद्धिक प्रमुख स्वान्तरंजन यांनी ‘कार्यकर्ता निर्माण, विकास, संभाल’ या विषयी तर ‘समरसता – संकल्पना तथा कार्य’ याविषयी पश्चिम क्षेत्र प्रचारक नीलेश गद्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘सोशल मीडिया कार्यविस्तार और प्रांतोंकी सहभागिता’ या विषयी चर्चा करण्यात आली. प्राचीन कला, लोककला, रंगावली, संगीत, चित्रकला, नृत्य, साहित्य, नाट्य या सर्व विधांनी ‘समरसता’ या विषयावर प्रांतीय स्तरावर करण्याचे काम यावर विचार झाला.
दोन दिवस चाललेल्या बैठकीच्या समारोपप्रसंगी संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार वासुदेव कामत उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी, बंगळुरू येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार्या आगामी अखिल भारतीय कलासाधक संगमच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि त्याबद्दल असणार्या अपेक्षासुद्धा स्पष्ट केल्या.
ते म्हणाले, “बंगळुरू येथे होणार्या कलासाधक संगमात येणार्या प्रत्येकाने यातून आपण काय न्यायचे याचा विचार करावा, चिंतन करावे, आपल्याला प्रांतात कसा कार्यक्रम करता येईल याहीपेक्षा वेगळे काय करता येईल यावर विचार करून, तिथून विचारांचा चांगला ठसा मनात घेऊन जावा न फक्त मोबाइल मध्ये सेल्फी ! मोबाइलमध्ये सेल्फी काढण्याच्या लोकांच्या अतिरेकी सवयीवर कामतजींनी सोदाहरण भाष्य केले. सेल्फी काढणे किंवा सतत फोटो काढत राहणे यामुळे त्या विषयावर अथवा एखाद्या सुंदर कलाकृतीवर लक्ष केन्द्रित करण्याऐवजी सर्व लक्ष मोबाईलमधेच असते, त्यामुळे तो विषय त्याला समजतच नाही. यामुळे सर्जनशीलता कमी झाली आहे असे निरीक्षण नोंदविले. हे टाळले तर पाहिजे व या वाईट सवयीपासून दूर राहिले पाहिजे, काही नवे करण्याचे विचार मनात आले पाहिजेत, अशा कलासाधक संगमामधून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितले. आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करतानासुद्धा हाच विचार डोक्यात ठेवला पाहिजे, भले तो कार्यक्रम छोटा असला तरी हरकत नाही पण समाजाला समरसतेचा विचार देणारा असला पाहिजे. समरसतेची प्रेरणा घेऊनच सर्वांनी तिथून आपल्या प्रांतात समरसतेचे कार्य करायला परतायचे आहे. या वेळी समरसता विषय सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. रामायण कथेतून आपल्यासमोर प्रभू रामाचे व्यक्तिमत्व अनेक तर्हेने, वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीद्वारे अनेकांनी आपल्यासमोर मांडले आहे. त्यातील व्यक्तिमत्वांबरोबरच अनेक प्रसंगातून शिकण्यासारखे आहे. त्यातील समरसता, समता, बंधुता, नातेसंबंध असे अनेक विषय घेऊन आणखीही काही नवनिर्मिती होऊ शकते, ज्यातून समाजाला चांगला संदेश मिळू शकतो. अशा विषयातून नुसतेच प्रसंग उभे न करता रसिक प्रेक्षकांच्या हृदयात तार छेडली जाईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील असा परिणाम साधला गेला पाहिजे असे त्यांनी संगितले.
या संदर्भात त्यांनी संतांचे उदाहरण दिले. जे जे संत आपल्याकडे होऊन गेले त्या त्या संतांनी समरसता विषय आपल्या अभंगातून, रचनातून तर मांडलाच आहे पण ते स्वत: समरसतेचे जगले व आपल्या आचरणातसुद्धा त्यांनी समरसता जपली होती हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत, काही आपल्याला माहितीही नसतील, काही रचनासुद्धा आपल्यापर्यंत आल्या नसतील, पण त्या कल्पना घेऊन आपणही एक चांगली कलाकृती/कार्यक्रम तयार करू शकतो. ते आपण केले पाहिजे असे ते म्हणाले.
समारोपानांतर पुढील वर्षाच्या नियोजनाची व धोरण म्हणून ठरलेल्या विचारांची शिदोरी घेऊन देशभरातील प्रमुख कार्यकर्ते रवाना झाले.