पुणे : ‘जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय मराठी… मी मराठी’चा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात, फुलांची उधळण करत, टाळ मृदंगाच्या नादात आणि राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करीत पुणे रेल्वे स्थानकावर ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’चा आज (दि.१९) जल्लोषात शुभारंभ झाला. दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात महादजी शिंदे एक्सप्रेस दिल्लीकडे साहित्य संमेलनासाठी रवाना झाली. सुमारे बाराशे साहित्यिक एकाच वेळी एकत्र घेऊन दिल्लीकडे गाडी रवाना झाली.
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. याकरिता पुण्यातून विशेष गाडी सोडण्यात आले आहे. ही गाडी बुधवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून सुटली. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी याच गाडीतून नगरपर्यंत प्रवास करत साहित्यिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती, ज्येष्ठ कवियित्री बर्वे यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी सभासद, रेल्वेचे अधिकारी आणि साहित्य वर्ग उपस्थित होता.
पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आले असून बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. विशेष रेल्वेचे पुणे स्थानकात आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. प्रत्येक बोगीला लावलेली तोरणे लक्ष वेधून घेत होते.
मराठी साहित्ययात्री संमेलनापूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तुळशी वृदांवन घेऊन महिला यात सहभागी झाल्या होत्या. पोवड्यांचे बहारदार सादरीकरणही या प्रसंगी झाले. नादब्रह्म पथकाचे दमदार ढोल-ताशा वादन झाले. यात जवळपास तीस तरुणांचा सहभाग होता. ढोल-ताशा आणि टाळ-मृदंगाच्या वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासमोर प्रत्येक जण नतमस्तक होताना दिसत होता.
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर रंगणार प्रवासी साहित्य संमेलन
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच तसेच जगातील सर्वात मोठे व दीर्घ संमेलन आहे.