पुणे(प्रतिनिधि)–राजीव गांधी यांनी आपल्यावर टीका करताना म्हटले होते, हम दो हमारे दो… परंतु गत १० वर्षे आणि यंदाची पाच वर्षे अशी १५ वर्षे देशात भाजपच्या नेतृत्वाखालचे सरकार आहे. १० वर्षांच्या कार्यकाळानंतर अजिबातही सरकारविरोधी लाटेचा फटका आपल्याला बसला नाही. त्यामुळे लोकसभेतील आपले यश छोटे मानता येणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांच्या निराश मनाला अमित शाह यांनी उभारी देण्याचा प्रयत्न केला. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल, असे सांगताना मुख्यमंत्रीही भाजपचाच असेल, असे अप्रत्यक्षपणे संकेत त्यांनी दिले. माझ्या बोलण्याचा नीट अर्थ समजून घ्या, असे आवर्जून सांगत भाजप कार्यकर्त्यांना अधिक मेहनतीचा सल्ला दिला.
पुढील ३० वर्षे भाजपची सत्ता देशात येईल
बाजीराव पेशवा आणि बाळगंगाधर टिळक यांच्या या पुण्यनगरीमध्ये सांगतो आहे, आत्ता तर फक्त १० वर्षे पुर्ण झाली आहेत. पुढचे ३० वर्ष भाजपचे सरकार या देशात येईल. आपल्यातील आत्मविश्वासाला जागरूक करण्याची गरज आहे. आपल्यातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. महान भारताची रचना ही केवळ भाजपचं करू शकते. याच आत्मविश्वासासह पुढे जायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशीतील गरीब नागरिकांना घरे दिली, शौचालये दिली, गॅस सिलिंडर दिले, वीज दिली. गरीबांना अन्नधान्य दिलं, ५ लाखापर्यंत विमा दिला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, आणि लाडका भाऊ योजना देत आहेत. गरीब कल्याणांचं कोणताही काम काँग्रेस पक्ष करू शकत नाही किंवा त्यांचा कोणता मित्रपक्ष हे काम करू शकतो. गरिब कल्याणचं काम हे फक्त भाजपचं करू शकते, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत पुढील ३० वर्षे भाजपची सत्ता देशात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं?
अमित शाह म्हणाले, जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आम्ही २४० जागा जिंकल्या आहेत. इंडिया आघाडीच्या सर्वांचे मिळूनही तेवढ्या जागा नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय. आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो. २०२४ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.