पुणे(प्रतिनिधि) –कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरी परिसरातील समर्थ डेव्हलपर्सच्या इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उज्वला नागनाथ वारुळे (वय ४०) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून नागनाथ वसंत वारुळे (वय ४२, रा. रायखेल, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहेत.या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार वैजिनाथ श्रीधर केदार (वय ३६) यांनी नागनाथ वारुळे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ वारुळे हे आंब्याचा व्यवसाय करत होते. मागील ७–८ महिन्यांपासून ते पुण्यात वास्तव्यास होते. समर्थ डेव्हलपर्सच्या अपूर्ण इमारतीत ते आपल्या पत्नीबरोबर राहत होते.
गुरुवारी दुपारी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून पाहणी केली असता, उज्वला वारुळे यांचा मृतदेह घरात आढळून आला, तर नागनाथ वारुळे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलीसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
या खुनामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपीने आत्महत्या केल्याने याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणी मृतांचे नातेवाईक व इतर साक्षीदारांची चौकशी करण्यात येणार असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बागल करत आहेत.