पुणे : चंगळवाद आणि अति हव्यासाच्या पोटी आपण हरितक्रांतीचे मूळ बिघडवून टाकले आहे. यामुळे आपण देशातील माती आणि पाणी नष्ट करत चाललो आहोत. हीच परिस्थिती राहिली तर देशातील ग्राम संस्कृती नष्ट होईल आणि देश मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त करतानाच देशातील ग्राम संस्कृती, कृषी संस्कृती, गोवंश वाचवला तरच देश वाचेल, अशी भावना आदर्श गाव समितीचे प्रमुख पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने राज्यातील विविध गोसेवकांचा पोपटराव पवार यांच्या हस्ते भांडारकर इन्स्टिटयूट च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, शेखर धर्माधिकारी, दादा वेदक, राजेंद्र लुंकड, महेंद्र देवी, रमेश अग्रवाल, विजय वरुडकर, श्रीकांत कुलकर्णी, सुधीर पाचपोर, नितीन आपटे, कान्होपात्रा गायकवाड,सुनील बेनके, डॉ रवींद्र वाघोले, जगदीश गजऋषी, विशाल वरुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गो विज्ञान संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांना विवेकानंद गोसेवक जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. अनिल पांडे, कमलेश सावला ,डॉ गणपत झिरोनकर, प्रतीक भेगडे, शिवप्रसाद कोरे, परमेश्वर स्वामी, विठ्ठल मुरकेवार, डॉ अजित उदावंत, अमर ढगे, आनंद कोल्हटकर ,नंदा बिरजे, तृप्ती अग्निहोत्री, अश्विनी बेलन या गो सेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पोपटराव पवार म्हणाले, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कृती आणि संस्कारांचे शिक्षण पाहिजे त्याप्रमाणात दिले जात नाही. त्यामुळेच आजची तरुणाई ही चंगळवादाकडे झुकत चालली आहे. त्यांना पाणी आणि मातीचे महत्त्व पटवून दिले तरच या तरुणाईला निसर्गाविषयी प्रेम आणि आकर्षण वाटेल.
दादा वेदक म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिंदुस्तानी परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली पाहिजे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गो सेवेचा प्रचार आणि प्रसार करून गोसेवेला संपूर्ण जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, गो सेवक अगरबत्ती, धूप, साबण अशा विविध प्रकारची उत्पादने तयार करतात. परंतु या उत्पादनांचे योग्य प्रकारे मार्केटिंग होत नसल्यामुळे ही उत्पादने शहरापर्यंत पोहोचू शकत नाही. गो सेवेची संस्कृती ही ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये पोहोचविली पाहिजे. त्यासाठी गो सेवेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग होणे गरजेचे आहे. या साठी कोहिनूर ग्रुप यांच्या सहयोगाने आम्ही राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत गो संवर्धन सहयोग अभियान या यूट्यूब चैनल ची आज सुरुवात करत आहोत.
या प्रसंगी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी मागील ८ वर्षांचा सामाजिक संस्थेचा कार्य प्रवास सांगितला. तसेच विवेकानंद जयंती निमित्त व राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांना जागतिक पातळीवर रोजगार उभारणी साठी प्रयत्न व्हावेत यासाठी मिशन अटल आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र माध्यमातून आम्ही काम करणार आहोत अशी भूमिका मांडली. या वेळी टाटा सोशल ट्रस्ट व मोक्ष योगा द्वारे सुरू असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली.
रसायन मुक्त शेती कॅन्सर मुक्त स्वस्थ भारत घडवण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य अभियान अंतर्गत येणाऱ्या ५ वर्षात राज्यातील ७५००० शेतकरी कुटुंब यांना ७५००० देशी गोवंश आधारीत शेती उत्पादन साठी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.
सीमा लिमये, नितीन आपटे, श्रीकांत कुलकर्णी,विठल मुरकेवार, प्रतीक्षा ढवळीकर,संतोष सुरवसे, चेतन मराठे, सागर पाटील, रवींद्र चव्हाण, विशाल वरूडकर यांनी कार्यक्रम संयोजन केले होते. रमेश अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. डॉ आशिष पोलकडे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित व्यक्तींचे आभार मानले.