पुणे– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणाचा टप्पा 50 टक्केंच्या पलिकडे जाऊ शकत नाही, अशी वास्तव परिस्थिती असतांना मराठा आणि ओ.बी.सी समाज आरक्षणाची मागणी प्रखरतेने मांडत आहे. पंरतू एकीकडे सरकारी नोक-या कमी होत असतांना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात अधिकाधिक रोजगारभिमुख उद्योगधंदे आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील खासगी उद्योगविश्वाची गुंतवणूक कशी वाढेल यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलातर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यीक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 52 व्या स्मृतीदिनानिमित्त ‘समतेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे का’ या विषयावरील महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्या महाचर्चेचे उद्घाघाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस, तर महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट हे या महाचर्चेचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आण्णा भाऊ साठे यांचे सहकारी प्रा. रतनलाल सोनग्रा, कामगार सुरक्षा दलाचे सरचिटणीस प्रविण बाराथे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, क्रांतीविर लहुजी वस्ताद स्मारक समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय डाखले, संजय गांधी निराधार समिती हवेलीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत कांबळे, नवोदित गायिका राधा खुडे, ‘माझा रशियाचा प्रवास’ या पुस्तकाचा रशियन भाषेत अनुवाद करणा-या लेखिका अनघा भट बेहरे यांचा पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, आैद्योगिकरण वाढवून रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त कशा उपलब्ध होतील हे आपल्याला पाहणे भविष्यासाठी आवश्यक ठरणार आहे. दोन समाजांमधली सलोखा कमी होऊन दरी वाढत चालली आहे. लहान मुलांना कोवळ्या वयातच त्यांच्या मनावर एकतेची भावना वृद्धिंगत होण्यासाठी पाठ्यपुस्तकातून समतेचा आणि बंधुभावाचा विचार रुजवला पाहिजे. समाजमन घडविण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातील हा प्रभावी मार्ग आहे.
डाॅ.श्रीपाल सबनीस म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे विश्वाचे शाहीर होते. त्यांना एका जाती पुरते बांधुन ठेवणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय होईल.अण्णाभाऊ साठे यांना एका जाती पुरते आणि लाल, निळा, भगवा अशा कोणत्याच रंगात बुचकळू नका, आण्णाभाऊ साठे यांनी केवळ एक दिवस शाळा करुन संपूर्ण जगाला उमगेल आणि उमजेल असे वैश्विक तत्वज्ञान त्यांच्या साहित्यातून मांडले. अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व एका वर्तुळा पुरते नक्कीच मर्यादित नाही. त्यांचा जन्म मातंग समाजात झाला असला तरी ते केवळ मातंग समाजापुरते मर्यादित नव्हते. ते महाराष्ट्र, भारतापुरते मर्यादित नव्हते. लोकनाट्य आणि तमाशा या सारख्या लोककलांच्या मार्फत या मराठी मातीतील अण्णाभाऊ साठे या साहित्यीकाने त्यांची साहित्य पताका साता समुद्रपार फडकवली.