पुणे- राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेस नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांना दिनानाक 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीट त्यांनी केले होते. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 25 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, राजीव सातव उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सातव यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. तब्येतीत हळूहळू सुधारणा होईल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली. कोरोना संसर्गानंतर दिली जाणारी सर्व औषधं त्यांना दिली आहेत. रेमडेसिव्हीर दिलं आहे. एचआरसीटी स्कोअर 7 आणि 25 होता, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
राजीव सातव यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, अशी माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.
महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्समधले डॉक्टर शशांक जोशी, राहुल पंडित त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात जहांगीर हॉस्पिटलमध्ये सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.