पुणे- पुण्याच्या उपमहापौर बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या उपमहापौर आरपीआयच्या सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी रात्री पक्षाकडे सुपूर्द केला आहे. पक्षातील वरिष्ठांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. दरम्यान, शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार आणि भाजप पुन्हा आरपीआयला संधी देणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा सुरु असतानाच दहा महिन्यांवर महापलिकेच्या निवडणुका आल्याने भाजपने हे पद आरपीआयला देण्याचा निर्णय घेतला असून उपमहापौरपदी आरपीआयच्या नगरसेविका आणि विद्यमान गटनेत्या सुनिता वाडेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे.
पुणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. आरपीआयचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र, भाजपला शहरात आरपीआयचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. भाजपचे सभागृह नेते धीरज घाटे यांचा राजीनामा घेऊन त्या जागेवर गणेश बिडकर यांची वर्णी लागली होती. तेव्हाच उपमहापौर बदलाची चर्चा सुरु होती. मात्र, तेव्हा शेंडगे यांना अभय मिळाले होते. आरपीआयने हे पद आपल्याकडेच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार प्रयत्न केले आणि त्याला यश मिळाले आहे. भाजप उपमहापौरपद आरपीआयला द्यायला भाजप तयार झाले आहे. दरम्यान, आरपीआयच्या पक्षांतर्गत बैठकीत वाडेकर यांच्या नावावर एक मुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे उपमहापौर पदाच्या औपचारिकताच आता बाकी आहे.