चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावरील कथित अश्लील वक्तव्यांप्रकरणी रिलस्टार संतोष पंडित यांना अटक

संतोष पंडित अटक पुणे
संतोष पंडित अटक पुणे

पुणे(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महापालिकेच्या विधी समिती सदस्य मिताली कुलदीप साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित अश्लील, लैंगिक स्वरूपाची आणि बदनामीकारक वक्तव्ये तसेच व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरवारी मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून अटक देखील केली.

याप्रकरणी कोथरूड येथील सारिका राम कांबळे यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, 2 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरील युट्यूब पाहत असताना संतोष पंडित यांच्या नावाने असलेल्या एका खात्यावर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह आशयाचा व्हिडीओ आणि मजकूर प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

अधिक वाचा  भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

तक्रारीत म्हटले आहे की, मिताली साळवेकर यांच्याबाबत लैंगिक स्वरूपाची शेरेबाजी करण्यात आली असून त्यांचे छायाचित्र वापरून अश्लील भाषेचा वापर करण्यात आला. संबंधित मजकूर आणि वक्तव्यामुळे महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, तसेच स्त्रीचा अपमान होईल, याची जाणीव असूनही तो प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही कथित अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर व वक्तव्ये व्हिडीओच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पोस्ट आणि व्हिडीओमधून खोटे व बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा तसेच समाजामध्ये गैरसमज आणि असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

ही कथित पोस्ट मोठ्या संख्येने नागरिकांनी पाहिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित व्हिडीओ आणि पोस्ट १० जुलै ते २ सप्टेंबर या कालावधीत प्रसारित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  पुणे मनपातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना प्रशासनाने मोडीत काढू नये - गोपाळदादा तिवारी

या तक्रारीवरून कोथरूड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल माने करीत आहेत.

संतोष पंडित यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा

संतोष पंडित यांच्याविरोधात नुकताच डेक्कन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर आणि वक्तव्यांप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत भाजप नगरसेवक सुनील पांडे यांनी तक्रार दाखल केली असून, आता कोथरूड पोलिस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याने पंडित यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love