‘क्रायसॅलिस’चा बॉक्स क्रिकेटमध्ये ऐतिहासिक जागतिक विक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

'क्रायसॅलिस'चा बॉक्स क्रिकेटमध्ये ऐतिहासिक जागतिक विक्रम
'क्रायसॅलिस'चा बॉक्स क्रिकेटमध्ये ऐतिहासिक जागतिक विक्रम

पुणे (प्रतिनिधी): ‘क्रायसॅलिस एंटरप्रेन्योर फोरम’ने (CEF) बॉक्स क्रिकेटच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. १५ फेब्रुवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या या स्पर्धेने जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट स्पर्धा म्हणून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, बॉक्स क्रिकेटसाठी यापूर्वी असा कोणताही जागतिक विक्रम अस्तित्वात नव्हता, त्यामुळे ‘सीईएफ’ने या खेळासाठी नवीन श्रेणी निर्माण करून इतिहास घडवला आहे.

६६ संघ आणि ७२६ खेळाडूंचा महासंग्राम

३ फेब्रुवारी २०२६ रोजी बावधन येथे या ‘क्रायसॅलिस एसएमई लीग’चा (CSL) शुभारंभ झाला होता. या स्पर्धेत पुणे, मुंबई आणि परिसरातील ३० पेक्षा अधिक लघु व मध्यम उद्योगांतील (SME) एकूण ६६ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातील ११ खेळाडू असे एकूण ७२६ कर्मचारी या स्पर्धेत उतरले होते. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

अधिक वाचा  ‘ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच.. पण... काय म्हणाले शरद पवार?

कठोर निकष आणि यशस्वी पूर्तता

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ अधिकृत निर्णायक प्रवीण पटेल यांनी या स्पर्धेची कठोर तपासणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र प्रदान केले. ते म्हणाले की, “या विक्रमासाठी किमान ५०० सहभागींची अट होती, परंतु फोरमने ७२६ सहभागींसह ही स्पर्धा यशस्वी केली. १३ दिवसांत १३५ सामने पार पाडणे हे अवाढव्य कार्य क्रायसॅलिसने शिस्तीने पूर्ण केले.”

मनीष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तिसरा विक्रम

क्रायसॅलिस एंटरप्रेन्योर फोरमचे अध्यक्ष मनीष गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा संस्थेचा तिसरा जागतिक विक्रम ठरला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये स्कायडायव्हिंगसाठी ‘लिम्का बुक’ आणि स्कुबा डायव्हिंगसाठी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ संस्थेच्या नावावर आहे. हा विक्रम स्वीकारताना मनीष गुप्ता यांच्यासोबत रचना गुप्ता (संस्थापक) आणि विदिशा कुकरेजा (उपाध्यक्ष) उपस्थित होत्या.

अधिक वाचा  'बटेंगे - कटेंगे’ची भाषा संविधानाशी प्रतारणा : गोपाळदादा तिवारी

 

“उद्योजक असणे ही अभिमानाची बाब आहे, या ब्रीदवाक्याला जागतिक स्तरावर नेण्याचा आमचा हा प्रयत्न होता. हा विजय केवळ खेळाचा नसून टीम स्पिरिट आणि उद्योजकतेचा आहे.”

— मनीष गुप्ता, अध्यक्ष, क्रायसॅलिस एंटरप्रेन्योर फोरम

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love