पुणे(प्रतिनिधी)–आपल्या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळ ही कायमच महत्त्वाची ठरली आहे. वेळोवेळी भक्ती चळवळीने आणि त्या योगे संतांच्या प्रयत्नाने देशाच्या विविध भागातील समाजाला एकसंध राहण्याचे बळ दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हीच भक्ती परंपरा, त्या अंतर्गत येणारे काव्य, साहित्य, अभंग पुन्हा एकदा समाजासमोर प्रस्तुत व्हावेत या उद्देशाने पुण्यातील कन्नड संघ व कावेरी कलाक्षेत्र यांच्या वतीने ‘भक्ती लहरी’ या पहिल्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी यांनी दिली.
येत्या शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी एरंडवणे गणेश नगर येथील डॉ. कलमाडी श्यामराव हाय स्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे सायं ५ वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
सदर उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना मालती कलमाडी म्हणाल्या, “देशावर झालेल्या अगणित परकीय आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर देशात विविध भागात वेगवेगळ्या वेळी उभी राहिलेली भक्ती चळवळ ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरली. यासोबतच निर्गुण ईश्वराची भक्ती करण्याची शिकवण देणारी ही चळवळ प्रत्येक धर्म, पंथातील अनुयायांसाठी जवळची देखील ठरली. त्या त्या काळातील संतांचा या चळवळीत असलेला वाटा लक्षणीय आणि समाजाला प्रत्येक वेळी एक ठोस दिशा देणारा होता. हीच भक्ती परंपरा पुन्हा एकदा साजरी करण्यासाठी कन्नड संघ व कावेरी कलाक्षेत्रच्या वतीने आम्ही हा उपक्रम हाती घेत असून या अंतर्गत पहिला कार्यक्रम आयोजित करीत आहोत.”
‘भक्ती लहरी’ या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना गायन, वादन आणि नृत्य यांचा संगम अनुभविता येणार असून या कार्यक्रमात हिंदी, मराठी, कन्नड, गुजराथी, तमिळ, तेलगु, बंगाली, पंजाबी, संस्कृत आणि राजस्थानी भाषेतील संत रचनांचे सादरीकरण होईल. या रचनांमध्ये प्रामुख्याने ७ ते १७ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, पुरंदरदास, कनकदास, अंडाल, संत मीराबाई, नरसी मेहता, संत सूरदास, संत तुलसीदास, संत कबीर दास, महात्मा बसवेश्वर आणि संत अन्नमाचार्य अशा तब्बल २५ संतांच्या संतरचनांचा समावेश असून कार्यक्रमाचे लिखाण वाडिया महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रो. गुरुराज कुलकर्णी यांचे आहे.
‘भक्ती लहरी’ कार्यक्रमामध्ये सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात ज्या घराण्याच्या मोठा वाटा आहे अशा ‘सताररत्न’ या पदवीने ओळखल्या जाणाऱ्या घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस बाले खान आणि संगीत नाटक अकादमीचा २०२२-२३ सालच्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मानित पुण्यातील युवा गायिका विदुषी नंदिनी राव गुजर यांचे सादरीकरण होईल. तर अंजली रामास्वामी व स्फूर्ती राव हे कलाकार भरतनाट्यम सादरीकरण करतील. यावेळी हेमंत जोशी (तबला), यशवंत हम्पी होळी (मृदंगम), अजयचंद्र मौली (व्हायोलिन), अर्श शाह (गिटार) हे कलाकार साथसंगत करतील. तर प्रो. गुरुराज कुलकर्णी हे कार्यक्रमाचे निरुपण करतील.