पुणे मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर शिक्षकांचे घंटानाद आंदोलन
Spread the love
Post Views:3,219
पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर शाखेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारी घंटानाद आंदोलन केले. जोपर्यंत सर्व प्रश्न निकाली लागत नाहीत, तोपर्यंत दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत हे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
शिक्षण हे पवित्र कार्य असून शिक्षकांना पदोन्नती मिळणे हा त्यांच्या सेवेचा सन्मान आहे. मात्र, या सन्मानाकडे दुर्लक्ष केले जात असून अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संघटनेने यापूर्वी प्रशासनासोबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती आणि प्रशासनाने आश्वासने देखील दिली होती, परंतु त्या आश्वासनांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही असा आरोप यावेळी करण्यात आला.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
1.सन 1977 च्या पुणे महानगरपालिकेच्या ठरावानुसार व पिंपरी चिंचवड महानगरपालिके प्रमाणे पुणे महानगरपालिकेतील प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक कर्मचारी यांना केंद्र सरकार जेव्हा कर्मचाऱ्याना महागाई भत्ता व घरभाडे भत्ता कर्मचाऱ्याना लागू
करते. त्याच प्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना ही लाभ देण्यात यावा.
2. शासन निर्णयाप्रमाणे सर्व माध्यमाच्या सेवाजेष्ठता याद्या तात्काळ प्रदर्शित करण्यात याव्यात.
3. मुख्याध्यापक पदोन्नती व विषयशिक्षक दर्जोन्न्ती तात्काळ पूर्ण करून सर्व पात्र शाळांना मुख्याध्यापक व विषय शिक्षक देण्यात यावेत.
4. शिक्षकांच्या जीवनातील सेवानिवृत्ती हि त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाची व जिव्हाळ्याची बाब आहे. शासनाने सदर बाबीची दाखल घेवून कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्यात यावे यासाठी आदेशित केले असतानाही सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक महिने होवूनही शिक्षकांना सदर लाख मिळत नाही. यासाठी पुणे जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयाप्रमाणे सेवानिवृत्ती च्या दिवशी पेन्शन चे सर्व लाभ देण्यात यावेत.
5. गृहकर्ज, वाहन कर्ज, संगणक कर्ज शिक्षकांना कमीत कमी 4% व्याज दराने देण्यात येत होते. ते पुन्हा सुरु करून वाटप करण्यात यावे.
6.सेवा हमी कायदा व ई- ऑफिस प्रणाली पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात तात्काळ लागू करावा म्हणजे शून्य पेंडन्सी या केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाची आमलबजावणी होईल.
7. GPF व DCPS व सर्व कर्जाचा हिशोब शिक्षकांना दर आर्थिक वर्षाच्या शेवटी स्लिप द्वारे देण्यात यावा.
8. शिक्षण सेवक नियुक्तीच्यावेळी शिक्षकांना हंगामी नियुक्ती देण्यात येते पण तीन वर्ष पूर्ण झाल्यानतर त्यांना स्थायित्वाचा लाभ देण्यात येतो तो अद्यापपर्यंत देण्यात आला नाही. सर्व शिक्षकांना कायम नेमणूक / स्थायित्व याचा लाभ शासन आदेशाप्रमाणे देण्यात यावा, म्हणजे शिक्षकांची सेवा कायम होण्यास मदत होईल.
9. NPS राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील पात्र कर्मचाऱ्याना तात्काळ लागू करावी. 10. न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्याची जाहिरात नोव्हेंबर 2005 पूर्वीची आहे त्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी.
11. कोरोना सारख्या महामारीत शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून काम केले. प्रवासाच्या दृष्टीने ते वेळेत कामावर हजर होवू शकले नाहीत. सदर अनुपस्थित कालावधी क्षमामापन करून ज्या शिक्षकांच्या विनावेतन करण्यात आले आहेत त्यांचे सदर कालावधीतील वेतन अदा करण्यात यावे हि विनंती. व शिक्षकांना न्याय द्यावा.
12. शिक्षकांना देय्य असलेली वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी पात्र शिक्षकांना मागील 4 ते 6 वर्षापूर्वी देणे अपेक्षित होते पण वेळोवेळी विनंती करून हि अपेक्षित कार्यवाही पूर्ण करण्यात आली नाही. तसेच 2006 पासूनचा चित्रकला व संगीत शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक त्वरित वितरीत करण्यात यावा.
13. नव्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रात नव्याने 34 समाविष्ठ गावातील शाळांना मुला/मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिपाई व रखवालदार पुरविण्यात यावेत.
14. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना इंटनेट ही सुविधा पुरविणे व सर्व शाळा ई- लर्निंग करणे.
15. नव्याने समाविष्ठ गावातील शाळेच्या वेळा मागील शैक्षणिक वर्ष सन 2024 25 मध्ये जिल्हा परिषदे प्रमाणे कायम ठेवण्यात आली होती पण शैक्षणिक वर्ष सन 2025 -26 मध्ये सदर शाळांची वेळ पुणे महानगरपालिकेतील शाळेप्रमाणे बदलून सकाळ / दुपार सत्रात भरविणे बाबत आदेशित करणे बाबत.
16. नव्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ठ 34 गावातील शाळांना शालेय पोषण आहार योजना जिल्हा परिषदेमार्फत तांदूळ व धान्यादी साहित्य पुरविण्यात येत व बचत गटामार्फत तो शिजवून देण्यात येतो. पण सन 2025 2026 या शैक्षणिक वर्षापासून मनपा शालेय पोषण आहार सेन्ट्रल किचनला जोडणे बाबत आदेशित करण्यात यावे अथवा या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभाग कोणत्या पद्धतीने सदर प्रक्रिया राबविणार याबाबत आदेशित करण्यात यावे.
17. शिक्षकांची सेवा जोड प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे.
18. रजा मुदत 93 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देणे बाबत.
19. सर्व माध्यमाचे मुख्याध्यापक व विषय शिक्षक पदोन्नती व दर्जीन्ती पूर्ण केल्याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येवू नये,
20. परिपत्रकाप्रमाणे बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.
21. ०३ मुख्याध्यापकांना त्यांच्या मान्यतेच्या दिनांकानुसार मुख्याध्यापक पदी नियुक्ती न देता ८ ते ९ महिन्याच्या विलंबानंतर नियुक्ती देण्यात आली आहे सदर नियुक्ती आदेशात बदल करून मा. अतिरिक्त आयुक्त (ज) यांचा मान्यता आदेश व मा. प्रशासकीय अधिकारी यांच्या यांचे निवेदन यातील दिनांकानुसार नियुक्ती देण्यात यावी.
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मनपा पुणे श्री. संदीप शिरगावे, पुणे विभागीय महिलाध्यक्ष श्रीमती रेखा कामथे, पुणे विभागीय अध्यक्ष श्री. रविंद्र सातकर, कला विभाग राज्याध्यक्ष मनपा श्री. महेंद्र दळवी, महिला शहर प्रमुख श्रीमती वर्षा उगलमुगले, कोषाध्यक्ष श्री. तानाजी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष श्री. संदीप कुमावत, सरचिटणीस श्री. हिरामण सगभोर, कार्यकारी राज्याध्यक्ष मनपा श्री. सचिन डिंबळे, उपाध्यक्ष श्री. संतोष सुतार आणि शहराध्यक्ष श्री. राहुल सुतार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.
या सर्व मागण्या तात्काळ निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी नम्र विनंती संघटनेने केली आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर संघटना आपले आंदोलन तीव्र करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.