पुणे(प्रतिनिधि)-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील पसार आरोपींना आश्रय देऊन मदत केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्यासह पाच जणांना पोलीसांनी सोमवारी (दि. २६) रात्री अटक केली. या आरोपींना मंगळवारी (दि. २७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता अकरावर पोहोचली आहे. (Five people including former Karnataka minister’s son arrested in Vaishnavi Hagavane dowry case)
प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या माजी मंत्र्याच्या चिरंजीवाचे नाव आहे. त्याच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनाही अटक करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर तब्बल सात दिवस पसार असणार्या वैष्णवीचा सासरा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील या पिता-पुत्राला पोलीसांनी २२ मे रोजी अटक केली. पोलीस चौकशीत दोघे आरोपी लगतच्या तालुक्यात तसेच सातारा जिल्हा आणि कर्नाटकातील कुगनोळी येथे बलेनो, थार, इंडेव्हर अशा आलीशान कारमधून फिरल्याचे समोर आले. फार्म हाऊस, लॉज, शेतावर राहत यथेच्छ पार्ट्याही झोडल्याचे आणि मटणावर ताव मारल्याचेही समोर आले होते. पसार असताना राजेंद्र व सुशील हगवणे यांना या आरोपींनी आश्रय दिला. त्यांना लपवले. त्यांना राहण्याची सोय करून दिली, आर्थिक मदत पुरवली, अशी माहिती तपासात समोर आली आहे. कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणेसाठी करण्यात आलेले बुकिंग प्रीतम पाटील यांच्या नावावर असल्याचेही उघड झाले आहे.
सर्व आरोपींना मंगळवारी (दि. २७) न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिस कोठडीसाठी मागणी करण्यात येणार आहे. आरोपी हगवणे पसार असताना नेमक्या काय हालचाली झाल्या, कोणकोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या अटकेनंतर आणखी काही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता
वर्तवली जात आहे.
अश्व पाळण्याच्याछंदातून झाली मैत्री
आरोपी प्रितम पाटील याचे वडील वीरकुमार पाटील हे कर्नाटकात काँग्रेसचे सलग २८ वर्षे आमदार होते. त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता. त्यांचे सुपुत्र अटकेत आल्यानंतर कर्नाटकासह महाराष्ट्रातही राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आरोपी राजेंद्र हगवणे आणि प्रितम पाटील या दोघांनाही अश्व पाळण्याचा छंद आहे. त्यातूनच त्यांची मैत्री झाली होती.
”वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना काही जणांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, प्रीतम पाटील याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २७) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.”
विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त – पिंपरी- चिंचवड)