पुणे(प्रतिनिधि)–“आठ महिन्यांच्या तान्ह्या बाळाला सोडून कोणतीही आई आत्महत्या करणार नाही. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळल्या आहेत, ज्यामुळे ही आत्महत्या नाही तर हा खूनच आहे” असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी केला आहे. “या कुटुंबातील मुख्य पुरुष सदस्य अद्याप फरार कसा काय? पुरोगामी महाराष्ट्रात एका २४ वर्षीय मुलीला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुळशी तालुक्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेला पाच दिवस उलटूनही वैष्णवीचा पती राजेंद्र हगवणे अद्याप फरार असल्याने, या प्रकरणाला अधिक गूढ वळण लागले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, वैष्णवीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. “आठ महिन्यांच्या तान्ह्या बाळाला सोडून कोणतीही आई आत्महत्या करणार नाही असे म्हणत या कुटुंबातील मुख्य पुरुष सदस्य अद्याप फरार कसा काय? पुरोगामी महाराष्ट्रात एका २४ वर्षीय मुलीला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. गरज पडल्यास आपण स्वतः मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा विषय माझ्यासाठी राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. वैष्णवी ही महाराष्ट्राची लेक आहे. २१ व्या शतकात हुंड्यासाठी मुलींची हत्या होत असेल, तर तो महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे कृत्य करणाऱ्यांना माणूस म्हणणेही योग्य नाही,” अशा कठोर शब्दांत सुळे यांनी संताप व्यक्त केला.
राजकीय पार्श्वभूमी, तरीही गंभीर आरोप
हगवणे कुटुंब हे मुळशीतील एक प्रतिष्ठित व राजकीय पार्श्वभूमी असलेले कुटुंब असून, या कुटुंबातील दोन सुनांवर यापूर्वीही घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या गोष्टीकडे लक्ष वेधत सुळे म्हणाल्या, “घरात स्त्रियांवर हिंसा करणाऱ्या कुटुंबाच्या कार्यक्रमात जाणे मला योग्य वाटले नाही. म्हणूनच मी एका कार्यक्रमाला जाणे टाळले होते.”
“वैष्णवी ही महाराष्ट्राची लेक आहे. तिच्यावर माझ्या लोकसभा मतदारसंघात हिंसा झाली, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात राजकारण न करता निष्पक्ष व संवेदनशील चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
माध्यम व संसदेच्या माध्यमातून न्यायाची अपेक्षा
सुळे यांनी यापूर्वी संतोष भाऊ (संतोष देशमुख) हत्या प्रकरणात बजरंग आप्पा सोनवणे यांनी संसदेत आवाज उठवल्याचे उदाहरण देत, त्याच पद्धतीने या प्रकरणातही न्याय मिळायला हवा, असे म्हटले. माध्यमांच्या सजग भूमिकेमुळे या प्रकरणाला दिशा मिळावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अजित दादांचा काय संबंध?
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची मृत वैष्णवी सून आहे त्यामुळे अजित दादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. मात्र, अजित दादा यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. ते फक्त त्यांच्या लग्नाला गेले होते. लग्नानंतर ते असे करतील असे थोडेच अजित दादांना माहिती होते असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित दादांची पाठराखण केली.