पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील मुळशी तालुक्यातील हुंडाबळी ठरलेल्या २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिचे लहान बाळ अखेर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या (कसपटे कुटुंब) ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळ कोणाकडे आहे याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
मुळशी तालुक्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेला पाच दिवस उलटूनही वैष्णवीचा पती हगवणे अद्याप फरार असल्याने, या प्रकरणाला अधिक गूढ वळण लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बाळ काही काळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. त्यापूर्वी बाळ इकडून तिकडे फिरवले जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवीचे काका बाळ घेण्यासाठी गेले असता, निलेश चव्हाण यांचे घर बंद होते. त्यानंतर त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला, ज्याने बाळ आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आणि बाणेर हायवेवर येण्यास सांगितले. काका तेथे पोहोचले असता, त्या अनोळखी व्यक्तीने बाळ त्यांच्या ताब्यात दिले आणि लगेच निघून गेला. ही व्यक्ती कोण होती, हे त्यांना समजले नाही. निलेश चव्हाणनेच त्या व्यक्तीमार्फत बाळ पाठवले का, हे स्पष्ट झालेले नाही. बाळ ताब्यात मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले नाही.
दरम्यान, बाळ ज्या निलेश चव्हाणकडे होते, त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याच्यावर कारवाई केली जाईल. वैष्णवीच्या कुटुंबीयांच्या मते, निलेश चव्हाणकडे बाळ पाच दिवस होते आणि त्यामुळे बाळ अशक्त झाले आहे. कुटुंबीय त्याच्या विरोधात १०० टक्के तक्रार दाखल करणार आहेत. निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचाही आरोपही वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
बाळाचे नाव ‘जनकराज’, प्रकृतीची चिंता
बाळाचे नाव जनकराज असल्याचे समोर आले आहे. बाळ खूप लहान असल्याने तो बोलू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांना बाळाच्या आरोग्याची चिंता असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. बाळ आजीच्या (वैष्णवीच्या आईच्या) हातात आल्यानंतर खूप आनंदित दिसले आणि हसले. आजीला बाळाला स्पर्श केल्यावर आपली वैष्णवी परत आल्यासारखे वाटले, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बाळ आल्याने दुःखी कुटुंबात काही अंशी दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा अजूनही फरार आहेत. त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे. बाळ सुखरूप परत आले असले तरी, जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत बाळ सांभाळणार असल्याचे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.