- मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीमंडळातील जागेवर छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवले जाण्याची शक्यता आहे. भुजबळ तिसऱ्यांदा या खात्याची जबाबदारी सांभाळू शकतात.
मागील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली होती. भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली खंत व्यक्त केली होती. आता मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांची नाराजी दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भुजबळ यांनी शपथविधीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही त्यांनी ऋण व्यक्त केले. मंत्रीपदाबाबतचा निर्णय सुमारे आठ दिवसांपूर्वीच एका बैठकीत निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. “ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल”, ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजकीय वर्तुळात भुजबळांच्या समावेशामागे त्यांचे ओबीसी समाजावरील प्रभाव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते म्हणून भुजबळ यांना नाराज ठेवणे राष्ट्रवादीला परवडणारे नव्हते, असे बोलले जात आहे.