पुण्यात जमीन हडप रॅकेटचा पर्दाफाश: तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल

Land grabbing racket exposed in Pune: Case registered against four including then senior police inspector
Land grabbing racket exposed in Pune: Case registered against four including then senior police inspector

पुणे(प्रतिनिधि)–पुणे शहरात पुन्हा एकदा पोलीस दलाला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. चंदननगर पोलीस स्थानकातून चालणारे जमीन व्यवहाराचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पुण्याजवळील वाघोली येथील तब्बल १० एकर जमीन बनावट कागदपत्रे आणि बनावट महिला उभी करून हडपण्याचा कट रचल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, आणि अपर्णा यशपाल वर्मा यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने चंदननगर पोलिसांनी एक तपास पथक स्थापन केले असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांवर तपास पथकाचा प्रामुख्याने भर आहे. या प्रकरणात पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचाही संबंध असल्याची चर्चा आहे, मात्र त्याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.

अधिक वाचा  दारु पिऊन गाडी चालवल्यास गाडी चालवण्याचा परवाना कायमचा रद्द होणार : पुणे पोलिसांचा निर्णय

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा कट २०२२-२३ या वर्षात रचण्यात आला होता. राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वात, अर्चना पटेकर नावाच्या महिलेला अर्पणा यशपाल वर्मा असे नाव धारण करण्यास सांगण्यात आले. तीच संबंधित जमिनीची मूळ मालक असल्याचे भासवण्यासाठी, तिच्या नावाने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड  तयार करून जमिनीच्या खरेदी-विक्रीचे बनावट दस्तऐवज (दस्त) तयार करण्यात आले. हा सर्व प्रकार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

कुख्यात गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी असो वा पोर्श अपघात प्रकरण असो, मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांशी संबंधित अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशात पोलीसच थेट जमीन विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने पुणे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love