पुणे(प्रतिनिधि)–दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील डेक्कन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. “सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा!” अशी भावनिक साद यामध्ये घालण्यात आली आहे. हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावे असे अनेकांची इच्छा आहे, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार हेच एकत्र बसून घेतील, असे भाष्य काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकास दिलेल्या मुलाखतीतकेले होते. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी एकत्रीकरणाबाबत भाष्य केल्यानंतर यासंबंधीच्या पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पवार गटातील पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिलं आहे. पक्षाचं हित पाहून वक्तव्य करावं असा सल्ला अंकुश काकडे यांनी विलीनीकरणाच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यासंबंधीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना निघण्यापूर्वी व्हावा. पक्षाच्या १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याविषयीची आपली भूमिका मांडू, असेही त्यांनी त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता या पोस्टरने चर्चेला उधाण आले आहे.
या पोस्टरमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्र फोटो असून, त्यांच्या सोबत शरद पवार यांचाही फोटो झळकवण्यात आला आहे. “लवकरच एकत्र येणार…” अशी सूचक मथळ्याची ओळही या पोस्टरवर झळकत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक येत्या बुधवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीत संभाव्य एकत्रीकरणावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक कार्यकर्ते आपली मतं, नाराजी आणि भावना थेट वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्याच्या तयारीत आहे.
पण या बैठकीपूर्वी डेक्कन चौकात लावण्यात आलेली पोस्टरबाजी लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या वतीने ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
या पोस्टरवरील मजकुरात म्हटलं आहे की,
“सुप्रिया ताई, साहेबांची ईच्छा पूर्ण करा. साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोपवले आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा व आपण पुन्हा एकत्र या. आपण सगळे पुन्हा एक कुटुंब होऊयात. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर आहे.”