पुणे(प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज व कॉल करून सतत त्रास देणाऱया आरोपीला पुण्यातील भोसरी येथून पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपी हा मूळचा बीड जिल्हय़ातील परळीचा रहिवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे.
अमोल काळे, असे या आरोपीचे नाव आहे. पंकजा मुंडे यांना मागील काही दिवसांपासून अनोळखी नंबरवरून अश्लील मेसेज व फोन येत होते. याबाबत त्यांच्यामार्फत मुंबईतील नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (वय 26) यांच्याकडून मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएस कलम 78 व 79 नुसार तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
आरोपीचे तांत्रिक लोकेशन काढून त्याचे विश्लेषण केले असता तो भोसरी परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली व त्यांच्या मदतीने अमोल काळे या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो विद्यार्थी असल्याचे व मूळचा परळीतील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या गुन्हय़ाची कबुलीदेखील दिली आहे. त्याने कोणत्या कारणास्तव पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज व कॉल केले याबाबत तपास करण्यात येत आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.