पुणे(प्रतिनिधि)–दोन वेळा भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘सोल इंडिया’ या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान करण्यात येणार आहे.
हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टीव्ह फाऊंडेशनच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जवाबदारी स्वरझंकारकडे सोपविण्यात आली आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी पद्मश्री हरिहरन, व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये व स्वरझंकारचे संचालक राजस व तेजस उपाध्ये उपस्थित होते.
याविषयी बोलतांना पद्मश्री हरिहरन म्हणाले, “संगीतातील विविधतेचा आनंद एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना मिळावा ही या महोत्सवाची मूळ संकल्पना आहे. महोत्सवात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, ठुमरी, महाराष्ट्र राज्याचे पारंपारिक संगीत प्रकार व इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक आदी संगीत प्रकारांचा समावेश असेल.” पुण्यातील रसिक प्रेक्षक हे नव्या प्रयोगांबाबत कायम सकारात्मक तर असतातच मात्र मोठ्या मनाने ते अशा प्रयोगांना प्रोत्साहन देखील देत असतात त्यामुळे ‘सोल इंडिया’ या महोत्सवाच्या आयोजनाला पुण्यापासून सुरुवात करीत असल्याचे हरिहरन यांनी आवर्जून नमूद केले.
महोत्सवाचा पहिला दिवस (२७ फेब्रुवारी) हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा असेल व त्यामध्ये सुप्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांचे सतारवादन व गुलाम नियाज खान यांचे गायन रसिकांना ऐकायला मिळेल.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२८ फेब्रुवारी) ‘साउंडस ऑफ महाराष्ट्र’ या महाराष्ट्रातील विविध संगीत परंपरांचा अंतर्भाव असलेल्या भव्य अशा विशेष कार्यक्रमाचा आनंद रसिकांना घेता येईल. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या कार्यक्रमात भजन, कीर्तन, नाट्य संगीत, भारुड, लावणी अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमात कलाकारांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाबरोबरच विशेषतः निर्मित अशा दृक-श्राव्य (ऑडिओव्हिज्युअल) कंटेंटचा वापर असेल. स्वतः राहुल देशपांडे व प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या या कार्यक्रमात सहभाग असेल.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (१ मार्च) ‘किंग्स इन कॉन्सर्ट’ या बॉलीवूड चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रमात स्वतः पद्मश्री हरिहरन व सुप्रसिद्ध गायक – संगीतकार शंकर महादेवन यांचे भव्य वाद्यवृंदासोबत स्वतंत्र व नंतर एकत्र होणारे गायन चित्रपट संगीताच्या रसिकांसाठी एक पर्वणीच ठरेल.
महोत्सवाचा चौथा व शेवटचा दिवस हा गझल व ठुमरी या खास संगीत प्रकारासाठींचा असेल. यामध्ये नव्या पिढीचे आश्वासक कलाकार सम्राट पंडित व मधुबंती बागची हे ठुमरी सादर करतील तर पृथ्वी गंधर्व व प्रतिभा सिंघ बघेल यांचे गझल गायन होईल. महोत्सवाची सांगता संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या गायनाने होईल.
महोत्सवाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांचे आयोजन कोथरूड येथील सुर्यकांत काकडे फार्म्स येथे करण्यात येईल. तर पहिल्या व चौथ्या दिवसाचे महोत्सवाचे ठिकाण हे आयोजकांच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महोत्सवातील चारही दिवसाच्या कार्यक्रमांची वेळ सांयकाळी ५ ते रात्री १० अशी असेल.
महोत्सवाच्या काळात पद्मश्री हरिहरन यांचे सुपुत्र अक्षय हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिकशी संबंधित काही कार्यक्रम देखील पुण्यात आयोजित करण्याची योजना आहे. याबरोबरच सदर महोत्सवात मी आधी गायलेली गाणी देखील वेगळ्या प्रकारात गाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हरिहरन यांनी नमूद केले.