पुणे(प्रतिनिधि)—राहुल गांधी यांनी परभणीला केवळ राजकीय हेतूने आले होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दिलेली भेट ही केवळ राजकीय भेट आहे. लोकांमध्ये, जाती जातींमध्ये विद्वेश तयार करायचा एवढे एकमेव ध्येय राहुल गांधी यांचे आहे. तेच काम गेल्या अनेक वर्ष ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचे त्यांचं काम आहे हे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या परभणी भेटीवर केली.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच परभणीत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे. न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचा कारण नाहीये आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई केली जाईल.
दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवारही त्याठिकाणी गेले होते याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, पवार साहेबांनी मला एवढंच सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. त्यांना सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे.
पालकमंत्रीपदाबाबत कुठलीही रस्सीखेच नाही
आमचे जे काही तीन पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे. ते एकत्रित बसतील आणि पुढच्या दोन-तीन दिवसात पालकमंत्री पदाबाबतची प्रक्रिया पूर्ण करतील असे सांगत पालकमंत्रीपदाबाबत कुठलीही रस्सीखेच नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.