पुणे : दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस आसाम आणि नागालँड स्थापना दिवस या नावाने साजरा केला जातो. या वर्षी रविवार, दि. १ डिसेंबर, २०२४ रोजी मुंबई येथे राजभवानात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवनातील ‘दरबार हॉलमध्ये स्थापना दिवसाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालविणाऱ्या ‘ईश्वरपुरम्’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात पूर्वीचलात सर्वपरिचित अशा ‘बांबू नृत्या’चे दिमाखदार सादरीकरण केले तर एस.एन.डी.टी. मुंबई महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी आसामी गीत आणि नृत्य सादर केले.
याप्रसंगी ‘ईश्वरपुरम्’चे अध्यक्ष विनील कुबेर आणि कोषाध्यक्ष प्रशांत जोशी यांनी राज्यपालांचा नागालँडची प्रसिद्ध शाल आणि स्कार्फ घालून सत्कार केला. ‘ईश्वरपुरम्’ संस्थेने तयार केलेल्या नागालँड विषयीच्या चित्रफितीचेही प्रदर्शन यावेळी करण्यात आले. राज्यपालांनी बांबू नृत्य सादर करणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या गुणांचे कौतुकही केले.