शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यसंत : राज ठाकरे

शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यसंत
शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यसंत

पुणे(प्रतिनिधि) : “गेल्या पाच वर्षातील राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणे पाहता किळस येते आहे. कोण कोणाच्या मांडीवर बसतेय, याचा थांगपत्ता लागत नाही. मते एकाच्या नावाने मागायची आणि सत्ता वाटेल त्या पद्धतीने उपभोगायची, अशी स्थिती सध्या आहे. हे असेच चालू राहिले, तर येत्या काळात महाराष्ट्राचे आणखी वाटोळे होईल. फोडाफोडीच्या या राजकारणाचे शरद पवार हे आद्यसंत आहेत,” अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्या हाताला (काँग्रेसला) आपण निवडून देणार आहात का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचेय, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, अशी साद ठाकरे यांनी घातली.

कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. फडके हौद चौकात झालेल्या सभेवेळी मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर व अनिल शिदोरे, उमेदवार गणेश भोकरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे व ऍड. गणेश सातपुते, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, महिला सेनेच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर, शहर संघटक प्रल्हाद गवळी, निलेश हांडे, शहर सचिव रवी सहाणे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंच्या अडचणी कमी होईनात : शिवसेनेचे खासदारही जाणार शिंदे गटात?

राज ठाकरे म्हणाले, “कसबा आणि कोथरूड माझ्यासाठी महत्वाचे आहे. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मनसेची स्थापना केली होती. त्यामुळे या मतदारसंघाशी माझे घट्ट नाते आहे. कसब्याला ऐतिहासिक वारसा आहे. माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत सोन्याचा नांगर फिरवून हे शहर वसवले होते. आज अस्ताव्यस्त वाढलेले हे शहर समस्यांनी ग्रस्त आहे. मात्र, आपण आपला इतिहास, स्वाभिमान विसरलो आहोत. केवळ जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन चालणार नाही, तर इतिहास समजून घेऊन तो जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

 

“शहर कसेही वाढत चालले आहे. त्याला कोणतेही नियोजन नाही. केवळ मेट्रो आणि उड्डाणपूल झाले म्हणजे शहराचा विकास होत नाही. येथील आमदार, खासदार निवडून येतात. त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. नियोजन नाही. परिणामी शहराचा बोजवारा उडाला आहे. आपण शिक्षित-अशिक्षित आहोत का यापेक्षा आपण सुज्ञ आहोत का, याचा विचार होणे ही आजच्या काळाची गरज आहे. कडवट हिंदुत्व, मराठीपण आपण कधीही सोडता कामा नये. इतर राज्यांप्रमाणे आपली प्रादेशिक अस्मिता जपली पाहिजे,” असेही राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

अधिक वाचा  पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत- राजेश टोपे

“राज्यात सुरु असलेला राजकीय खेळ वीट आणणारा आहे. २०१९ मध्ये ज्यांच्याबरोबर मते मागितली; स्पष्ट बहुमत घेतले. त्यांना सोडून पहाटेचा शपथविधी झाला. काकांनी डोळे वटारले की ते सरकार पडले. मग आश्चर्य वाटावे, अशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी झाली आणि सरकार आले. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे काँग्रेस व्हायला लागले, तर दुकान बंद करीन, असे सांगितले होते. त्यांच्या बाजूला यांनी यांचे दुकान थाटले, हे संतापजनक आहे. पुढे या तिघाडी सरकारमधून एकनाथ शिंदे ज्यांच्यामुळे बाहेर पडले, त्याच अजित पवारांना मांडीवर घेऊन बसले. असले गलिच्छ राजकारण चालू आहे, कारण आपल्याला चीड येत नाही,” अशी टीका सर्वच पक्षांवर राज ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री असताना इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळत असतो, हेदेखील त्यांना समजले नाही. म्हनुनच ढांगेखालून ४० आमदार गेले तरी यांना तपास लागला नाही. मग पक्ष गेला, चिन्ह गेले आणि हे घरातच बसले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना राज यांनी टोला लगावला. या बदलेल्या, दिशा भरकटलेल्या राजकारणाला सरळ करायचे असेल, महाराष्ट्र कायम दिशादर्शक राहावा, असे वाटत असेल, तर राज्यभरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. गणेश भोकरे याच्यासारखा एक तरुण, उमदा, धडपडा व अडीअडचणीत तुमच्यासोबत उभा राहणारा कार्यकर्ता तुम्हाला देतोय, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तुम्हा कसबावासीयांची आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  त्या स्वप्नात आहेत का? कोणाला म्हणाले चंद्रकांत पाटील असे?

तत्पूर्वी, गणेश भोकरे यांनी आपल्या भाषणात कसबा मतदारसंघात भाजपचा १५ वर्षे, तर काँग्रेसचा गेल्या दोन वर्षांपासून आमदार आहे. मात्र, कसब्यातील समस्या जैसे थे आहेत. जुन्या वाड्यांचा, वाहतूक कोंडीचा प्रश्न येथे मोठा आहे. त्यामुळे येथील स्थानिक लोक उपनगरांत स्थलांतरित होत आहेत. वाड्यांचा पुनर्विकास योग्य पद्धतीने झाला, तर कसब्याचे रूप पालटणार आहे. त्यामुळे आमदार झाल्यावर वाड्यांच्या पुनर्विकासाच्या नियमांत बदल करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भोकरे म्हणाले.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love