पुणे(प्रतिनिधि)–आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा पुण्यामध्ये केली. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा केली.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी गुरुवारी पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे आदी नेते उपस्थित होते. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न- छत्रपती सांभाजीराजे
स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादी ची अवस्था झालेली आहे. महायुती किंवा माविआ यांच्या नावावर कोणाचा सातबारा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. त्या सुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. मनोज जरागे यांनी पण एकत्रित यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन आपण लढू, ते आम्ही एकत्रित आलो तर आम्ही सगळे निवडून आणू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? – बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले की, मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा सवाल करत आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली, असे सांगत महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उमेदवार देत बंडाळी केली होती. परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळवू. जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल- राजू शेट्टी
राजू शेट्टी म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल. समन्वय समिती करण्यात येईल. ही समिती सर्व निर्णय घेईल. २६ सप्टेंबरपर्यंत ज्यांना परिवर्तन महशक्तिमध्ये यायचे आहे त्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ चरित्र, स्वच्छ चेहरा देण्याचं आमची कल्पना आहे.
महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगले काम करून दाखवतील असा विश्वास आहे.’
स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप म्हणाले,’ येत्या २६ सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्तीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन महाशक्ती मध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.’