पेनाँग(मलेशिया)/ पुणेः मलेशियातील पेनाँग राज्यात झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य केदारी यांनी मास्टर मेन (वय-३० ते ३९) गटाच्या ५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई करत महाराष्ट्रासह विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
प्रा.केदारींनी अंतिम फेरीत १:२१.२ अशी वेळ नोंदवित दैदिप्यमान कामगिरी केली. तर सौदी अरेबियाच्या अल्हायने १.२१.९ वेळेसह रौप्य तर पाकिस्तानच्या ईमरान डोगरने १.२२.३ अशी वेळ नोंदवत या गटात कांस्यपदक पटकाविले. यासह प्रा.केदारी यांनी २००० मीटर प्रकारातही सहभाग नोंदवत ६.३८.३ वेळेसह चौथा क्रमांक पटकाविला. प्रा.केदारींनी पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर रोइंग स्पर्धेत एकंदर चौथा क्रमांक पटकावल्यानंतर त्यांची भारतीय रोइंग संघात निवड झाली होती.
भारतीय रोइंग संघटनेच्या (आरएफआय) अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव यांच्याकडून संघातील निवडीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर प्रा.केदारींनी अवघ्या एका महिन्यात एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या बोट क्लबमध्ये संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करताना, आपल्या वेळेत कमालीची सुधारणा केली. प्रा. केदारी हे सध्या पूर्णवेळ नोकरी करत आशिया स्तरावर सुवर्णकामगिरी करणारे भारतातील एकमेव खेळाडू आहेत. तसेच, आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेले ते महाराष्ट्राचे एकमेव खेळाडू देखील होते.
या कामगिरीनंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, स्कुल ऑफ लॉच्या अधिष्ठाता डॉ.सपना देव, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.सुराज भोयार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.