पुणे(प्रतिनिधि)— स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी (provisional candidature) केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे. तसेच युपीएससीने पूजा खेडकर हिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूजा खेडकरने यूपीएससी पास होण्यासाठी अनेक कारनामे केल्याचं समोर आलं होतं. तिने तब्बल तीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती समोर आली होती. त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. तसेच यूपीएससीच्या परीक्षेत जास्तीत जास्त संधी मिळाव्या यासाठी पूजा खेडकर हिने नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलं होतं.
यूपीएससीने एखाद्याचं आयएएस पद काढून घेणं हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. यासाठी यूपीएससीने २००९ ते २०१५ या दरम्यानच्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची छानणी केली. यामध्ये १४.९९९ उमेदवारांचे प्रमाणपत्र योग्य ठरलं आणि एकट्या पूजा खेडकरचे प्रमाणपत्र बनावट निघालं. पूजा खेडकरने कलेक्टर होण्यासाठी यूपीएससीलाही गंडवलं. तिने स्वतःचं नाव तर बदललंच, पण आई-वडिलांच्या स्पेलिंगमध्ये बदल करून फसवणूक केली. त्यामुळेच पूजा खेडकरांनी नेमके किती वेळा परीक्षा दिली हे यूपीएससीलाही समजत नव्हते.
पूजा खेडकर प्रकरणासंबंधी यूपीएससीने २००९ ते २०२३ पर्यंत म्हणजेच मागील १५ वर्षात सीएसईच्या अंतिम शिफारस केलेल्या १५,००० उमेदवारांची माहिती तपासली. त्यामध्ये पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याही उमेदवाराने यूपीएससीच्या नियमानुसार परीक्षेच्या दिलेल्या प्रयत्नांपेक्षा जास्त प्रयत्न दिल्याचं समोर आलं नाही.
पूजा खेडकरने स्वतःचं नाव बदललं. पूजा दिलीप खेडकर, पूजा दिलीपराव खेडकर, पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशा विविध नावांनी तिने परीक्षा दिल्या. एका ठिकाणी तिने वडिलांचं नाव हे दिलीपराव खेडकर असं लिहिलं तर त्यानंतरच्या प्रकरणात तिने वडिलांचं नाव दिलीप खेडकर असं नोंदवल्याचं समोर आलं. पुन्हा तिने आईचेही नाव जोडत परीक्षेसाठी नावं नोंदवल्याचं समोर आलं आहे.
सातत्याने नाव बदलून परीक्षा दिल्याने पूजा खेडकरांनी नेमकी किती वेळा परीक्षा दिली हे यूपीएससीला शोधता आलं नव्हतं. त्यामुळे ओबीसीतून ९ प्रयत्न संपल्यानंतरही पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रवर्गातून दोन वेळा परीक्षा दिल्या.
यूपीएससीमध्ये दरवर्षी हजारो, लाखो उमेदवार ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्गातून परीक्षा देतात. ते प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलं आहे की नाही, त्यावरची तारीख, प्रमाणपत्रावर काही ओव्हररायटिंग आहे की नाही याची प्राथमिक छानणी करते, ही सर्व प्रमाणपत्र खरी आहेत की नाही याची सत्यता तपासण्याचे साधन किंवा व्यवस्था यूपीएससीकडे नाही. नेमक्या या गोष्टीचा फायदा पूजा खेडकरने घेतला आणि जिल्हा स्तरावर सक्षम अधिकाऱ्यांकडून बनावट प्रमाणपत्रं मिळवली.
पूजा खेडकरने पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून असताना चमकोगिरी केल्याने तिची वाशीम येथे बदली झाली होती. मात्र त्यानंतर तिचं ट्रेनिंग थांबवण्यात आलं. दरम्यान यूपीएससीने नाव बदलून परीक्षा दिल्याच्या प्रकरणात पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला होता. यूपीएससीने पूजा खेडकरवर कडक कारवाई करत तिचं आयएएस पद रद्द केलं आहे. तसेच भविष्यात परीक्षा देण्यास तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे.