पुणे : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या पुढाकारातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी ते १० वीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येईल.
स्वान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेतही माहिती दिली. प्रसंगी आम्ही पुणेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव, सचिव भूषण गायकवाड, स्वान रिसर्च फाउंडेशनचे सहसचिव अजित कारके, संचालक नारायण गायकवाड,उमेश वाखारे आदी उपस्थित होते.
शशिकांत कांबळे म्हणाले , “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये सहावी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगना, बिहार या राज्यात, तसेच भारताबाहेरील सार्क देशामधील नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव या देशामध्ये ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”
हेमंत जाधव म्हणाले, “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी १५ जुलैपासून नावनोंदणी सुरु झाली असून, १५ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे.”
अजित कारके म्हणाले, “आज पालक आपल्या मुलाने अनेक रिऍलीटी शोमध्ये सहभागी व्हावे, याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल.” संकेत स्थळ :https://swanrsfoundation.com/event/?r=11