पुणे(प्रतिनिधी)–कोणत्याही प्रगतीच्या टप्प्याचा पाया एका अशक्मय वाटणाऱया स्वप्नात दडलेला असतो. समर्पण, कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या मूल्यांच्या बळावर आपण ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतो. भविष्याचा वेध घेतला असता उच्च शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास प्रगतीचा वेग वाढेल, असे मत इन्फोसिसचे संस्थापक- अध्यक्ष पद्मविभूषण एन.आर. नारायण मूर्ती यांनी येथे व्यक्त केले.
जेष्ठ शास्त्रज्ञ आणि संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024 चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ये÷ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिंबायोसिस शिक्षण समूहाचे संस्थापक- संचालक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, पुण्यभूषणचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, प्रसिद्ध उद्योजक गजेंद्र पवार, सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे यंदाचे 36 वे वर्ष असून दोन लाख रुपये रकमेची थैली, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्यनगरीच्या ग्रामदैवतांच्या प्रतिमांचा समावेश असलेले वैशिष्टय़पूर्ण स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या जवानांचा आणि एका वीरमातेचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. रायफलमन मिन बहाद्दूर थापा, शिपाई दीपक बर्मन, लान्स नाईक अभिजीत पाटील, शिपाई तपस कुमार रॉय आणि वीरपुत्र कुणाल राजेंद्र बारपट्टेची आई वीरमाता विद्या बारपट्टे यांचा यात समावेश होता.
नारायण मूर्ती म्हणाले, समृध्दीची फळे शहरी आणि ग्रामीण भागात पोहोचत आहेत. आर्थिक प्रगती झाल्यामुळे जीवनस्तर उंचावल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पातळीवर शिक्षकांना प्रशिक्षित करून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अवकाश खुले करून देणारी शैक्षणिक व्यवस्था अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. विकसित देशातील भारतीयांशी समन्वय साधत हुशार मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृतीसारखी प्रोत्साहनपर पावले उचलत आपण प्रगतीची एक-एक शिखरे पादाक्रांत करू शकतो.
डॉ. माशेलकर म्हणाले, डॉ. विजय भटकर यांनी परम संगणकाच्या निर्मितीद्वारे तरुणांमध्ये चेतना आणि आकांक्षा जागवल्या. तसेच ‘यस आय कॅन’ हा विश्वास त्यांनी तरूणांमध्ये जागवला.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भटकर यांनी केवळ महासंगणक निर्माण केला नाही, तर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. विज्ञानाची खोली जाणून घेण्यासाठी आध्यात्माचे अधि÷ान मानून त्यांनी तंत्रज्ञान आणि आध्यात्म क्षेत्रात योगदान दिले आहे.
काँटम संगणकाची निर्मितीही पुण्यातच होणार : डॉ. भटकर
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. विजय भटकर म्हणाले, की आपल्याला संगणक यंत्रणा देण्यास नकार दिला गेला होता. तेथून सुरू झालेला आपला प्रवास आज भारतातच संगणक निर्मिती करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. एवढेच नव्हे, तर आपण संगणक निर्यातदेखील करीत आहोत. संगणक निर्मितीच्या माझ्या कार्यात सी-डॅकने मोठे योगदान दिले. सध्या भारतात दहा ठिकाणी सी-डॅकची केंद्र असून लवकरच ती संख्या 14 पर्यंत नेण्यात येणार आहे. परमसंगणक निर्मितीचा मान मला मिळाला. त्याच धर्तीवर काँटम एनर्जीवर आधारित पहिल्या काँटम संगणकाची निर्मितीदेखील पुण्यातच होईल, असा विश्वास मी पुणेकरांना यानिमित्ताने देतो. भारताच्या विकासासाठी सत्यम, शिवम, सुंदरम हे प्रारूपच उपयोगात येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुण्यभूषणचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली.