पिंपरी (प्रतिनिधी) : कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाला येत्या 16 फेब्रुवारीपासून सुरूवात होत असून, गायन वादन व नृत्य अशी संपूर्णपणे कलेची अनुभूती देणाऱ्या या महोत्सवात रसिकांना सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. नवी सांगवीतील निळू फुले रंगमंदिर येथे 16, 17 व 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ गायक सुधाकर चव्हाण यांनी केले आहे.
किराणा घराण्याचे गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते सुरूवात झालेल्या या महोत्सवाचे हे 26 वे वर्ष आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ व जेष्ठ कलाकारांना ऐकण्याची संधी या महोत्सवात रसिकांना मिळते.
मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘कलाश्री पुरस्कार’ किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद मश्कुर अली खाँ साहेब यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध बासरी वादक दीपक भानुसे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
महोत्सवात पहिल्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी गायिका मुग्धा वैशंपायन व पंडित सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, तर उस्ताद साबीर खान यांचे सारंगी वादन होईल. दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारी डॉ. नबनीता चौधरी यांचे शास्त्रीय गायन, पंडित राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरी वादन होईल. पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाने दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.
तिसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन व त्यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद मश्कुर अली खाँ यांचे शास्त्रीय गायन होईल. तसेच अमरत्या चटर्जी घोष यांच्या कत्थक नृत्याने या महोत्सवाची सांगता होईल.
दरम्यान, या महोत्सवाचे उदघाट्न आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते होणार असून, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी महापौर माई ढोरे अध्यक्षस्थानी, तर अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा असणार आहेत.