पुणे— वर्ष २०१३ मध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या झाली, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर्.आर्. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने तपास करत, मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन शस्त्रतस्करांना अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्तुलांनीच दाभोलकरांची हत्या झाली, याविषयीचा पुरावा म्हणून त्यांनी ‘फॉरेन्सिक अहवाल’ही न्यायालयात सादर केला होता. यानंतर या तपासावर असंतुष्ट असणार्या दाभोलकरांच्या परीवाराने उच्च न्यायालयात याचिका करून तपास ‘सीबीआय’कडे देण्याची मागणी केली. त्यानुसार ‘सीबीआय’ने तपास चालू केला आणि तोही न्यायालयाच्या निरीक्षणाच्या अंतर्गत चालू आहे. असे असतांना जर राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार आज ‘सीबीआय’ला अपयशी ठरवत असतील, तर ते त्यांचेच अपयश आहे असा आरोप सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला आहे.
सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्युप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून तपास काढून तो ‘सीबीआय’कडे दिल्याने झालेल्या नाचक्कीमुळे ‘सीबीआय’ला लक्ष्य करून राष्ट्रवादीचे नेते वक्तव्ये करत आहेत; मात्र दाभोलकर प्रकरणात त्यांच्याच गृहखात्याने केलेल्या चुकीच्या तपासाचा परीणाम सनातन संस्थेला भोगावा लागत आहे, असेही ते म्हणाले.
‘सीबीआय’च्या अपयशाविषयी बोलायचे झाले, तर आर्.आर्. पाटील यांच्या काळातील तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. जर या दोन शस्त्रतस्करांचा गुन्हा ‘फॉरेन्सिक अहवाला’तूनही सिद्ध होतो, तर मग त्या दोघांना ‘क्लीनचीट’ कशी काय मिळाली ? याबाबत ना दाभोलकर परिवार, ना तत्कालीन राज्य सरकार कोणीच काही बोलत नाही, असे प्रश्न चेतन राजहंस यांनी उपस्थित केला.
वर्ष २०१३ मध्ये दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात दाभोलकर कुटुंबियांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. कालांतराने तपास ‘सीबीआय’कडे गेला, नंतर राज्यात सत्तापालटही झाला. या प्रकरणी काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे नाहक अटकसत्र झाले. तरीही काही निष्पन्न झाले नाही, म्हणून दाभोलकर परिवार ओरडत राहिला.
आता तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांची ‘महाविकास आघाडी’ सत्तेवर आली, तरीही अद्याप तपासावर आणि शासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनाक्रमातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे सरकार कोणत्याही पक्षाचे असो, तपासयंत्रणा कोणतीही असो; ‘दाभोलकरांचा खरा मारेकरी कोण आहे’, यापेक्षा दाभोलकर परिवाराला ज्यांना मारेकरी ठरवायचे आहे, ते ‘मारेकरी’ अद्याप पकडलेले नाही, म्हणून कंठशोष चालू आहे.
यातून एरव्ही लोकशाही तत्त्वांच्या नावे टाहो फोडणार्या दाभोलकर परिवाराचा खरंच लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे का ? आता सर्व भारतीय ‘तपाससंस्थांकडून तपास करूनही काही मिळाले नाही’ असे म्हणत, आता विदेशांतील ‘एफ्.बी.आय.’कडे किंवा ‘स्कॉटलंड यार्ड’कडे तपास सोपवण्याची मागणी दाभोलकर कुटुंबिय करणार आहे का ?, असा प्रश्न चेतन राजहंस यांनी केला आहे.