पुणे- मातीत हात घातल्यानंतर होणारा स्पर्श, मातीच्या गोळ्याला आकार दिल्यानंतर त्याला येणारे मूर्त स्वरूप आणि डोक्यात घोळणारा आकार सत्यात उतरल्यानंतर होणारा मनस्वी आनंद या अनुभवांनी आम्ही समृद्ध झालो असून, मातकाम अर्थात पॉटरीद्वारे स्वत:ला व्यक्त करण्याचे मार्ग आम्हाला गवसले आहेत, अशा भावना देशाच्या विविध भागांमधून आलेल्या पॉटरी कलाकारांनी व्यक्त केल्या.
पुण्यातील इंद्रनील गरई यांच्या आयजीए गॅलेरियाच्या वतीने आणि भूमी पॉटरी यांच्या विशेष सहकार्याने सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल या ठिकाणी तिसऱ्या मेगा पॉटर्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. येत्या रविवार दि २२ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान सदर फेस्टिव्हल सुरु राहणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. या टप्प्यात २४ आणि पुढील टप्प्यात २४ असे देशभरातील तब्बल ४८ पॉटरी कलाकार या फेस्टिव्हलमध्ये सहभागी असणार आहेत. मातीपासून बनविलेल्या कलात्मक वस्तू, दागिने, शिल्पे, भित्तीचित्रे यांसोबतच मातकाम करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधत ही कला जवळून अनुभविण्याची संधी पुणेकरांना यानिमित्त अनुभविता येईल.
महोत्सवात सहभागी झालेल्या मुंबईच्या पॉटरी कलाकार शालन डेरे आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाल्या, “मागील ३५ वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत असून स्टोनवेअर, टेबलवेअर, शिल्पकाम मी करते. मागील काही वर्षांत या कलेबद्दल सामान्य नागरिकांना माहिती होऊ लागली आहे, याचा आनंद आहे. लोकांना काय हवं आहे यापेक्षा माझ्या मनाला कोणत्या प्रकारचे पॉटरी काम करण्याची इच्छा आहे, आवड आहे याला मी कायम प्राधान्य देते.
काही कामानिमित्त प्रागला गेलो असता तेथील सिरॅमिक मधील काम पाहून आपल्याला हेच करायचे आहे हे मी ठरवून टाकले. मागील १० वर्षे मी मिनीएचर आर्टमध्ये काम करत असून त्याद्वारे अनेक गोष्टी साकारतो असे अजय अभ्यंकर म्हणाले. मी विकेंड आर्टिस्ट आहे आणि आनंदासाठी ही कला जपतो, असेही त्यांनी नमूद केले.
कटवर्क, सिरॅमिक डेकोरेशन, एनग्रेव्हिंग, इंप्रेशन्स यामध्ये मी काम करते असे सांगत भोपाळच्या प्रलयंकिता शर्मा म्हणाल्या, “छंद म्हणून सुरु केलेले हे काम आज माझी आवड झाले असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कला पोहोचावी, त्याबद्दल माहिती व्हावे या उद्देशाने मी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहे. अनेक क्षेत्रांत चाचपडून पाहिल्यानंतर मी मातकाम, पॉटरी येथे स्थिरावल्याचा मला आनंद आहे.”
पॉटरी फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने स्टुडीओ पॉटर्स आणि आपल्या कलेला हाताने मूर्त रूप देणारे कलाकार यांचा सहभाग आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, वापरात येणाऱ्या मातीच्या वस्तू, सिरॅमिकमध्ये बनविलेली शिल्पे, भित्तिचित्रे, दागिने आणि विशेष कलाकृती पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. हा पॉटरी फेस्टिव्हल पुढील आठवड्यात २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल या ठिकाणी सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यानही असेल याची कृपया नोंद घ्यावी.