पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झालेल्या व्ही. अनुराधा सिंह (भोपाल), निलांगिनी कलंत्रे (जबलपूर) या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगनांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने रसिक पुणेकर मंत्रमुग्ध झाले. व्ही. अनुराधा सिंह (भोपाल) यांनी भक्ती नृत्ये सादर करून नेत्राचे पारणे फेडले.
त्यांनी नटवरी नृत्य, नटराज – नटवरी कथक नृत्य, आणि घुँघरू नृत्य सादर करून टाळ्यांचा कडकडाट मिळविला. यामध्ये, कृष्णाची भक्ती, विविध अंगानी त्यांनी नृत्याविष्काराने सादर केली. तसेच, घुंगरू आणि तबला यांची मनोहारी संगम असणाऱ्या संगीतावर त्यांनी सादर केलेला नृत्याविष्कार दाद मिळवून गेला. त्यांनी स्वतः रचलेल्या संगीत तालींवर देवी – देवतांवर केंद्रित केलेले श्लोक, पदे, ठुमरी, तराना, भजनांसह कथ्थकमध्ये उतान, बोल, तिहैया, परनो या तीन तालांमध्ये विविध देवी-देवतांच्या मनमोहक रूपे दाखविली.
यानंतर, प्रख्यात नृत्यांगना निलांगनी कलंत्रे (जबलपूर) यांनी त्यांच्या सहकलावंतांसमवेत सादर केलेल्या नृत्य विष्काराला रसिक प्रेक्षकांनी मोठी दाद दिली. त्यांनी रुद्राष्ट्कम, गणेश वंदना, प्रल्हाद कथा, कृष्ण कीर्तन, राधे राणी गीत, सरगम, सावन गीत सादर करून वन्स मोर मिळवले.
याप्रसंगी, पुणे फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवातील दिपाली पांढरे, अमृता जगधाने, सुप्रिया ताम्हाणे, करुणा पाटील आणि संयोगिता कुदळे यांनी कलावंतांचे सत्कार केले. कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.