पुणे(प्रतिनिधि)–असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) ची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (2023-24) पीवायसी जिमखाना येथे बुधवारी संपन्न झाली.याप्रसंगी एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक,खजिनदार प्रणव बेल्हेकर,सचिव समीर कोठारी आणि उपाध्यक्ष एन.शंकररमण उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक म्हणाले की,यावर्षी सदस्य कंपन्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून या क्षेत्राच्या प्रगती आणि कल्याणाप्रती आमच्या संस्थेची कटिबध्दता दर्शविते.ते पुढे म्हणाले की,एपीपीचा मुख्य उपक्रम असलेले प्लास्टो प्रदर्शन हे 8 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान मोशी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे अधिक भव्य व व्यापक पातळीवर आयोजित केले जाणार आहे.1 लाख चौरस फुटावर विस्तारलेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून 70 टक्के बुकिंग याआधीच झाले आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्लास्टो 2025 च्या कामातील प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली.वरिष्ठ सल्लागारांसह प्लास्टो कमिटीचा विस्तार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नवीन सदस्यांना प्रमाणपत्र,बॅग्स व पिन्स देऊन स्वागत करण्यात आले.संस्थेचे वरिष्ठ सदस्य कै.राधेशाम भट्टड आणि कै.यशवंत कर्वे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) ही संघटना 1981 मध्ये पुण्यात स्थापित करण्यात आली. या संघटनेचे मुळ उद्दिष्ट प्लास्टिक व निगडीत उद्योगांचा विकास,सर्व सदस्यांना एकत्र आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे,प्लास्टिक आणि पॉलिमर उद्योगातील आव्हानांवर उपाय शोधणे तसेच तंत्रज्ञानातील प्रगती बाबत सदस्यांना शिक्षित करणे हे आहे.