पुणे— देशात लोकशाही आहे काय, सध्या देशात दबावाचे वातावरण आहे. राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन अशा कारवाया करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं केलेल्या कारवाईबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, आता भाजप नेते आता उघड उघड आव्हाने देत आहेत. भाजप नेत्यांनी धमकी दिल्यानंतर अशा कारवाया होत आहेत. त्यामुळे आपला देश नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार जनतेने करण्याची गरज आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र आहे. आमची एकजूट कायम असून आम्ही ताकदीने उभे आहोत. जनतेला आमची ताकद माहित आहे. आम्ही कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
या घटनांमुळे न्यायप्रक्रिया आणि लोकशाही देशात आहे काय, याचा विचार करणे गरजेचे आहे. अशा घटनांमुळे देश कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. असे हीआदित्य ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भाषणामुळे पुण्यातल्या मनसैनिकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या विषयावर जास्त बोलायचं नसतं असा टोला मनसेला लगावला.