पुणे(प्रतिनिधि)— मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबाबत सरकारने काय आश्वासन दिले? की ज्यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले? ओबीसी समाजालाही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिले? की ज्यामुळे त्यांनीही उपोषण मागे घेतले हे समजले पाहीजे. ते अजूनही समोर आले नाही. अशा स्थितीत चर्चा सरकार करणार, आश्वासन सरकार देणार मात्र तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचे हे शहाणपणाचे नव्हते आणि त्यामुळेच या बैठकीला गेलो नाही असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. या दोन्ही समाजाला या आधी झालेल्या चर्चांमध्ये सरकारने काय आश्वासने दिली आहेत हे सरकारला सांगावे लागेल, असेही ते म्हणाले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मराठा आरक्षणाचे शरद पवारांना काही पडलेले नाही. अशी टिका करण्यात आली. ते फक्त राजकारण करत आहेत असा आरोपही करण्यात आला. त्यावर शरद पवारांनी पलटवार केला आहे. पुणे श्रमिक संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पवार बोलत होते. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल विचारले असता पवारांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत उपोषण केले. त्यावेळी त्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी सरकारमधले मंत्री गेले होते. शिवाय मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले. पुढे जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कुच केली. त्यावेळीही मुख्यमंत्री जरांगेंना नवी मुंबईत भेटले. दोघांनी एकत्र येवून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री यांनी जरांगें बरोबर काय चर्चा केली? त्यांना काय आश्वासने दिली? त्यातली किती पुर्ण झाली? याची माहिती सरकारने दिली नाही. दुसरीकडे ओबीसी नेत्यांबरोबरही सरकारमधील मंत्र्यांनी चर्चा केली. त्यांनीही त्यानंतर उपोषण मागे घेतले. त्यावेळी ओबीसी समाजाला सरकारने काय आश्वासन दिले होते हेही समोर आले पाहीजे. ते अजूनही समोर आले नाही. अशा स्थितीत चर्चा सरकार करणार, आश्वासन सरकार देणार मात्र तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचे हे शहाणपणाचे नव्हते त्यामुळेच या बैठकीला गेलो नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील का पडले?
विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत बोलताना पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा निवडणूक आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण तेव्हा आम्ही त्या जागा देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटलांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं.
संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची मतं जास्त होती. शिवसेना ठाकरे गटाकडे पुरेशी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी २३ मतं आवश्यक होती. माझं म्हणणं होतं, काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं ५० टक्के ठाकरे गटाला द्या आणि ५० टक्के मतं जयंत पाटलांना द्या.
काँग्रेसकडे अधिकची मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच होतं. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली, आणि जयंत पाटील पराभूत झाले असं शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होत होती. जास्तीच्या काँग्रेस आमदारांनी पहिलं मतं ठाकरेंना द्यावं आणि सेनेच्या आमदारांनी दुसरं मत शेकापला द्यावं, हे जर गणित जुळून आलं असतं तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य झालं नाही. त्यामुळे जयंत पाटील जिंकू शकले नाहीत, असं ते म्हणाले.
नेतृत्वावरून महाविकास आघाडीत संघर्ष नाही
लोकसभा निवडणुकीत जास्त जागा घेऊन जास्त उमेदवार निवडून आणण्यात यश आलं नाही. विधानपरिषदेला सुद्धा उमेदवार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हट्ट करतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, थोडा स्वभाव असतो एखाद्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आग्रही भूमिका घेत असतात. थोडं अडजेस्ट करावं लागतं. लोकांसमोर सामूहिकपणे जात असताना तडजोड करायच्या असतात. मात्र, त्यामुळे आम्ही अस्वस्थ होत नाही. जयंत पाटलांना विधानपरिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यामुळे मविआमध्ये नेतृत्वावरून संघर्ष आहे का असे विचारण्यात आलं असता शरद पवारांनी अजिबात नसल्याचे सांगितले.
भुजबळ- पवार भेट
पवार यांनी येऊन भेट घेऊन गेलेल्या छगन भुजबळांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ते भेटायला आले त्यावेळी अंगात ताप होता. त्यामुळे सुट्टी घेतली होती. पण आपल्याला उठवण्यात आले. भुजबळ भेटण्यासाठी आले आहेत असे सांगण्यात आले. त्यांना विचारलं किती वेळ झाला. त्यावर एक तासापासून ते बसले आहेत असे सांगितले. शिवाय भेटल्या शिवाय जाणार नाही असे ही ते म्हणत होते. त्यानंतर मी त्यांना भेटलो असे पवारांनी सांगितले. याभेटीत त्यांनी मध्यस्थी करण्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे पवारांनी सांगितले. पुढे भुजबळांची हल्लीची भाषणं फार छान झाली.ते बऱ्याच गोष्टी बोलले. बीड, बारामतीत चांगल्या प्रकारचे भाषण केली.माझ्याबद्दलही आगपाखड केली. हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
मला महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची काळजी
लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ.. हे यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलं. पण, महाराष्ट्रात अजित पवार आणि जयंत पाटील यांना ६ ते ७ वेळा अर्थसंकल्प मांडायची संधी मिळाली. मात्र, या ६ ते ७ वेळेत बहीण भाऊ कुठेही आलेले दिसले नाहीत. बहीण भावांचा विचार होतो आहे याचा आनंद आहे. मात्र, हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे, असा टोला शरद पवार यांनी महायुती सरकारला टोला लगावला. मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते. मला एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थितीची असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले, महाराष्ट्र हा देशातील २ ते ३ क्रमांकावरील राज्य होते, मात्र नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये, महाराष्ट्र ११ व्या क्रमांकाचे राज्य आहे, हे चिंता करण्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, अंदाजे ७ लाख ८० हजार कोटींचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. यावर्षीचं आत्ताचं कर्ज १ लाख १० हजार कोटींचं कर्ज हे वेगळं आहे, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार पुन्हा परत घेणार का?
अजित पवार पुन्हा परत येणार असतील तर त्यांना परत घेणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाले तर.. असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला, तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार यांनी मिश्किलपणे ‘अरे ती बारामती आहे… असे उत्तर दिले. पवारांनी असे म्हणताच एकच हशा पिकला. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो, पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील असे ते म्हणाले.