पुणे(प्रतिनिधि)— स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही जास्त रुबाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला यूपीएससीनंही आव्हान दिले होते. यूपीएससी नं खेडकरांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मध्ये आव्हान दिलं होतं. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं पूजा खेडकरांविरोधात निर्णय दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या विरोधात निर्णय देऊनही त्यांचं एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आलं, ज्यामुळे त्यांची आयएएस नियुक्ती निश्चित झाली. अपंगत्वाच्या दाव्याव्यतिरिक्त, पूजा खेडकरच्या ओबीसी नॉन-क्रिमी लेयर दर्जाच्या दाव्यांमध्येही विसंगती आढळून आली आहे.
पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करा
पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ४० कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यांच्या वडिलांची संपत्ती लक्षात घेता पूजा खेडकर यांची ओबीसी नॉन क्रिमी लेअर दर्जासाठी पात्र कशा ठरल्या? हा मोठा प्रश्न आहे, असं आरआयटीचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मग पूजा खेडकर नॉन क्रिमी लेअरमध्ये कशा मोडतील? असा सवालही आरआयटीचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पूजा खेडकर यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलं होतं. तसेच, अंशतः अंध असून विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तरीदेखील पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीत सहभागी होण्यास वारंवार नकार दिला आणि तरीसुद्धा त्या आयएएससाठी पात्र ठरल्या कशा, असा प्रश्नही विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. प्रोबेशनरी पदावर असताना त्यांना होम टाऊन कसे मिळाले? पोलिसांनी त्यांच्या गाडीवर कारवाई केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आईची दमदाटी
दरम्यान, पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केल्याचे समोर आले आहे. सगळ्यांनाच आतमध्ये टाकेन असं बोलत पूजा खेडकरांच्या आईने पोलिसांना दमदाटी केली, तसेच बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावून पोलिसांना गेटबाहेरच उभं केले होते. दरम्यान, पुणे वाहतूक पोलिसांनी गाडीवर लाल दिवा लावल्या प्रकरणी २१ हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे -रामदास आठवले
या सर्व प्रकरणाबाबत केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा घेतला असल्यास, ते अंत्यत गैर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तसेच त्यामध्ये पूजा खेडकर दोषी आढळल्यास त्यांना पदावरून हटविले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.
बदली नको बडतर्फ करा : रवींद्र धंगेकर
हे असे आयएएस अधिकारी सिस्टीममधले कलंक आहेत. या अधिकाऱ्यांची बदली होऊन काही होणार नाही. त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. या अधिकाऱ्यांच्या वडिलांनी तिचे बोगस सर्टिफिकेट बनवले. तिचे सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट या सगळ्याची तपासणी व्हायला हवी. घरातूनच तिला असे संस्कार मिळाले आणि त्यामुळे तिची वर्तणूक सुद्धा तशीच दिसत आहे. सिस्टीममध्ये अशा एकच पूजा खेडकर नाहीत, इतरही आहेत. पण यांच्यावर कठोर कारवाई केली. तरच सिस्टीम योग्य दिशेने जाईल. एक प्रकारे मुजोरी करणारे हे अधिकारी आहेत, अशी टीका त्यांनी केली.