पुणे- आजच्या काळात रामायण, महाभारतकालीन परिस्थितीवर भाष्य करीत असताना आपण आजच्या समाजाची मूल्ये व नियम त्याला लावता कामा नयेत. ही महाकाव्ये लिहिली गेली तो समाज आजच्या समाजाच्या तुलनेने अनेक अर्थाने अधिक उदारमतवादी होता हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे आहे, असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांनी व्यक्त केले. पुणे संवाद आणि अर्क स्टुडंट फोरम यांच्या वतीने गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील काळे सभागृह या ठिकाणी संपन्न झालेल्या पाचव्या पुणे संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. आज जे स्त्रीयांच्या हक्काबद्दल गळे काढतात त्यांनी महाकवी कालिदासांच्या नजरेतून शकुंतलेकडे न पाहता महाभारतातील शकुंतला वाचावी, तिची भाषणे वाचावीत. महाभारतात स्त्रीयांच्या हक्कासंबंधी अनेक भाषणे आहेत, असेही देबरॉय म्हणाले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज(डिक्की)चे संस्थापक संचालक डॉ मिलिंद कांबळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पुणे संवादचे समन्वयक मनोज पोचट व्यासपीठावर उपस्थित होते. बिबेक देबरॉय यांनी यावेळी ‘कर्म, धर्म आणि आधुनिक पेचप्रसंग : महाभारत पात्रांची पुनर्कल्पना’ याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आज आपण रामाला सीतेचा त्याग केला यासाठी दोषी ठरवितो मात्र, ज्या त्रेतायुगात रामायण घडले त्या काळात स्वत: वचन देणे, प्रतिज्ञा करणे किंवा अगदी वडिलांनी दिलेल्या वचनाचे पालन करणे याला अनन्यसाधारण महत्त्व होते. हे वचन पाळणे म्हणजेच व्यक्तीचा धर्म होता. महाभारत घडले तो द्वापरयुगाचा काळ या बाबतीत थोडा वेगळा होता. या काळात व्यक्तीपरत्वे वचने आणि प्रतिज्ञा पाळल्या गेल्या. भीष्माची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा आणि अर्जुनाची प्रतिज्ञा यामध्ये म्हणूनच वेगळेपणा आहे, याकडे देबरॉय यांनी लक्ष वेधले.
आज भारतीय युवक हे आपली संस्कृती, परंपरा यांपासून दुरावले आहेत. युवकांना आज वाचायला वेळ नाही आणि त्यांना आपल्या महाकाव्यांचे ज्ञान हे प्रत्येक गोष्टीप्रमाणे ‘इंस्टंट’ हवे आहे. महाभारत समजून घ्यायचे असेल तर संस्कृत भाषेत ते वाचावे, असे माझे वैयक्तिक मत आहे असे देबरॉय यांनी सांगितले.
पुढे बोलताना देबरॉय म्हणाले, “आज आपण संस्कृत विसरलो आहोतच मात्र आपल्याला आपली मातृभाषा देखील येत नाही अशी परिस्थिती आहे. आपले प्राचीन ज्ञान समजून घ्यायची ज्यांना इच्छा असेल त्यांना अमरचित्रकथेपासून सुरुवात करता येईल. रामायण, महाभारतामुळे आपल्याला अनेक प्रकारची भौगीलिक माहितीही मिळते. त्याच्या आधारावर आपण आपल्या संस्कृतीचे जतन करू शकतो.”
डॉ मिलिंद कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात डिक्कीच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. मनोज पोचट यांनी प्रास्ताविक केले आणि देबरॉय यांची ओळख करून दिली. हर्षिता तिवारी यांनी सूत्रसंचालन केले.