पुणे-युवा गायक सौरभ काडगांवकर यांचा दमदार भीमपलास, सरोद व तबल्याची जोरदार जुगलबंदी आणि लोकप्रिय गायक आनंद भाटे यांचा सुरेल पूरिया कल्याण यामुळे ‘सवाई’ च्या चौथ्या दिवशीचा पूर्वार्ध श्रवणीय झाला.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरु महोत्सवाच्या चौथ्या दिवशीचा प्रारंभ युवा गायक सौरभ काडगांवकर यांच्या दमदार गायनाने झाला. सौरभ यांनी समयोचित अशा ‘राग भीमपलास’ मधील ‘रे बिरहा…’ या विलंबित तीनतालातील बंदिशीने गायनाला सुरुवात केली. अतिशय शांत पद्धतीने बढत करत सौरभ यांनी भीमपलासचे रागरूप रसिकांसमोर सादर केले. त्यानंतर द्रुत त्रितालातील ‘नादसमुद्र’ ही रचना सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव ‘माझे माहेर पंढरी ‘ हा प्रसिद्ध अभंग त्यांनी सादर केला. त्यांना भरत कामत (तबला), अमेय बिचू (हार्मोनियम), प्रसाद जोशी (पखवाज) यांनी पूरक साथ केली. ओम चव्हाण आणि समीहन सहस्रबुद्धे यांनी तानपुरा साथ केली.
“सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरमंचावर आपली कला सादर करणे, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आज मीही स्वप्नपूर्तीचा क्षण अनुभवत आहे. ही संधी देणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या सर्व मान्यवरांना अभिवादन करतो,” असे मनोगत सौरभ यांनी मांडले. आवाज बसलेला असला तरी सुरातून रागाचे भावविश्व साकारण्यात ते यशस्वी झाले. भीमपलासचे शांत,करुण वातावरण त्यांनी चांगले उभे केले. भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भांडारी या मैफलीला उपस्थित होते.
दुसरे सत्र प्रसिद्ध सरोदवादक अमान अली बंगश यांच्या सरोदच्या धीरगंभीर स्वरांनी भारलेले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अमान अली यांच्या सोबत त्यांचे बंधू अयान अली हेही असणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे अमान अली यांचे एकल सरोदवादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली.
अमान अली यांनी गौरी रागाने वादनाला सुरवात केली. अल्प वेळ आलापांतून त्यांनी रागरूप दर्शवले. त्यांनी साथीसाठी दोन तबले घेतले होते. अनुव्रत चटर्जी आणि अमित कवठेकर या दोन तबलावादकांमुळे वादनात लयकारीचा पुरेपूर आनंद रसिकांना मिळणार, याचा अंदाज सुरवातीलाच आला होता. तो सार्थ ठरवत अमान अली यांनी दोन्ही तबलावादकांना मुबलक ‘स्कोप’ देत वादन रंगवले. सरोदसह दोन्ही तबलावादकांनी पूर्ण जोशात वादन करत मंडप भरून टाकला. द्रुत लयीतील त्यांच्या जुगलबंदीसदृश वादनाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. परस्परांना पूरक स्वरसंवाद करत समेवर येण्याची त्यांची पद्धत हमखास दाद मिळवत होती. लयकारीचे अनेकानेक पॅटर्न त्यांनी ढंगदारपणे पेश केले. वादनातील सवाल जवाबही रसिकांच्या जोरदार प्रतिसादाने रंगले. ‘देस’ रागातील रचना सादर करून अमान अली यांनी वादनाला विराम दिला.
सवाईचे तिसरे सत्र लोकप्रिय गायक आनंद भाटे यांच्या सुरेल ‘पूरिया कल्याण’ ने श्रवणीय ठरले. ‘आज सो बना’ ही ख्यालाची बंदिश आनंद भाटे यांनी सुरेल आलापीतून भरली. ‘बहुत दिन बीते…’ या त्रितालातील बंदिशीतून त्यांनी दाणेदार तानांचे दर्शन घडवले. त्यानंतर कान्होपात्रा नाटकातील ‘जोहार मायबाप जोहार ‘ हा अभंग त्यांनी तन्मयतेने सादर करत भक्तिरसाची अनुभूती दिली. त्यांच्या या गायनाला रसिकांनी वन्स मोअर ने दाद दिली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), सुखद मुंडे (पखवाज) यांनी गायनाची रंगत वाढविणारी साथ केली. ललित देशपांडे, आशिष रानडे यांनी तानपुरा तर माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य यांचा शनिवारी अमृत महोत्सव वर्षानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर आणि सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शुभदा जोशी, मित्रविंदा भट, आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
“मी प्रथम पुण्यात आलो, तेव्हा गुरुजी भीमसेनजी यांना सांगितले की, मला मराठी भाषा येत नाही आणि इथे माझे कुणीही नाही. तेव्हा गुरुजी मला एवढेच म्हणाले होते, की तुम्ही गाणं चांगलं करा, तुम्हाला इथे कधीच कमी पडणार नाही,” त्यांचे आशीर्वाद खरे झाले. मी कृतज्ञ आहे कारण रसिकांचे प्रेम लाभले आहे,’.