पंच प्रशिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील धोरणांची गरज – पवन सिंह


पुणे-कोणत्याही खेळामध्ये खेळाडू बरोबरच प्रशिक्षक, खेळाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी यांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युरी अर्थात पंच हे महत्वपूर्ण भूमिका निभावताना पाहायला मिळतात. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच घडविण्याबाबत आपल्याकडे अद्यापही जागरूकता नाही. खेळाच्या क्षेत्रात भारताला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देत राष्ट्रीय पातळीवरील ठोस धोरणांची आखणी करणे गरजेचे आहे, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या ज्युरी अर्थात पंच समितीत निवड झालेले पहिले भारतीय व गन फॉर ग्लोरी या देशातील अग्रगण्य नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंह यांनी व्यक्त केले.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (NRAI) संयुक्त महासचिव, इंटरनॅशनल शुटींग स्पोर्टस् फेडरेशन (ISSF) या जागतिक स्तरावर नेमबाजी खेळाचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या पंच समितीत (ज्युरी) सलग दोन वेळेस स्थान मिळवणारे पहिलेच व एकमेव भारतीय याबरोबरच इंटरनॅशनल शुटींग स्पोर्टस् फेडरेशन (ISSF) तर्फे भारतात आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेचे उत्तमरित्या व्यवस्थापन करणारे अशी पवन सिंह यांची ओळख असून आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणा-या १३० देशांमधून निवड करण्यात आलेल्या केवळ २० आंतरराष्ट्रीय पंचांपैकी ते एकमेव व पहिलेच भारतीय आहेत.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण

याविषयी अधिक माहिती देताना सिंह म्हणाले, “पंच म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती आणि म्हणूनच २००८ पासून मी या दृष्टीने तयारी करीत राहिलो. आरटीएस ज्युरी (रिझल्ट टायमिंग स्कोरिंग) ही यासाठीची सर्वांत कठीण समजली जाणारी परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर  स्वप्नांची कवाडे माझ्यासाठी उघडी झाली. येत्या काही दिवसात होणा-या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून सहभागी होण्यासाठी मी उत्साही असून त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, पंच म्हणून काम करण्याची इच्छा असणा-या अनेकांना या संदर्भात उपलब्ध असलेली अपुरी माहिती मी जवळून अनुभविली. जर आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या देशातील पंच असतील तर स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. इतकेच नव्हे तर स्पर्धेच्या संदर्भात नियमांमध्ये वेळोवेळी होणारे बदल व आपली बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायची झाल्यास अनेक गोष्टींबाबत स्पष्टता या गोष्टी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या ठरतात, हे मी अनुभविले आणि म्हणूनच पंच प्रशिक्षणाकडे एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले गेले पाहिजे असे मला वाटते.”

अधिक वाचा  लग्न समारंभासाठी शासनाने जारी केलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नाहीत

आपल्याकडे प्रशिक्षक असलेली व्यक्तीच ही पुढे पंच म्हणून काम करण्याकडे वळत असताना ती खेळादरम्यान प्रत्येक खेळाडूसोबत तटस्थ असण्यासंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जातात. आणि म्हणूनच पंच म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे माझे मत आहे. खेळाच्या क्षेत्रात भारताला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देण्याची गरज आहे. प्रशिक्षक व खेळाडूंना त्या दृष्टीने तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक बदल महत्त्वाचे ठरतील, असेही सिंह यांनी नमूद केले.

पंच प्रशिक्षण धोरणाबाबत केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू हे सकारात्मक आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे सिंह यांनी आवर्जून सांगितले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघात आजवरील सर्वाधिक १५ नेमबाज सहभागी होणार आहेत जे २० पदकांसाठी स्पर्धेत उतरतील. इलावेनिल वालारिवन व स्वरूप उन्हाळकार यांनी आमच्या गन फॉर ग्लोरी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले आहे याचा मला आनंद आहे. भारतीय संघातील नेमबाजांची तयारी पाहता या संघाकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, असे सिंह म्हणाले. येत्या २४ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान नेमबाजीच्या स्पर्धा टोकियो येथे पार पडणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love