
पुणे- “कुठल्याही पायाभूत सुविधा नसतानाही, विद्यापीठ स्तरावर उत्तमोत्तम कलाकार घडवण्याचे कार्य विद्यापीठांतील कलाविभाग करत आहेत. अशा परिस्थितीत किमान शासकीय विद्यापीठांमध्ये तरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी”, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे माजी संचालक आणि ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केली. ‘विनोद हा सध्या गंभीर विषय झाला आहे. विनोदाने सध्या जायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे’, असेही आळेकर म्हणाले.
ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी आळेकर बोलत होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. राम नगरकर कलागौरव पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून अकरा हजार रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह आणि रामनगरी पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर, राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर आणि पुत्र उदय नगरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
आळेकर पुढे म्हणाले, “आपल्याकडे उत्तम, दर्जेदार विनोदाची दीर्घ परंपरा आहे. पण सध्याचे वातावरण पाहता विनोदाने जायचे कुठे, असा प्रश्न पडत आहे आणि विनोदावर हसा, रागवू नका, असे सांगायची वेळ आली आहे. जुन्या काळी राम नगरकर आमच्या घरी येत असत. त्यांचे काम मी पाहिले आहे. संदीप हा आमचा विद्यार्थी आहे. आपल्या व्यक्तिमत्वातील वैगुण्य आपले अस्त्र म्हणून कसे वापरायचे, त्याचेच भांडवल कसे करायचे, हे त्याने दाखवून दिले आहे. त्याचे यश आणि कर्तृत्व यांचे मी कौतुक आणि अभिनंदन करतो.”
मनोगतात संदीप पाठक यांनी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. “आईवडील मराठीचे प्राध्यापक असल्याचा फायदा झाला. त्यांच्या संस्कारांनी धीर, संयम शिकवला त्यामुळे मुंबईच्या स्पर्धात्मक, व्यावहारिक आणि व्यावसायिक विश्वात तग धरू शकलो. कारकिर्दीच्या सुरवातीलाच लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, सतीश तारे अशा गाजलेल्या कलाकारांसोबत कामाची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप शिकता आले. माझे गुरू प्रा. दीपक घारे आणि सतीश आळेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणे, हे सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे वाटते”, असेही पाठक म्हणाले.
समीर बेलवलकर म्हणाले, “कलाकार आणि रसिक यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आम्ही संस्कृतिक मंचद्वारा करत आहोत. कलागुण, कलेप्रती निष्ठा आणि समाजभान या निकषांवर या पुरस्कारासाठी निवड केली जाते. ती यंदाही त्याच योग्यतेची झाली आहे. डॉ. वैजयंती नगरकर यांनी मनोगतात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. समीर बेलवलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांनी राम नगरकर कला गौरव पुरस्काराविषयी उपस्थितांना माहिती दिली. संध्या नगरकर (वाघमारे) यांनी मानपत्राचे वाचन केले. तर मंदा नगरकर (हेगडे) यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राजेश दामले यांनी संदीप पाठक यांच्याशी संवाद साधला. ललित कला केंद्रामधून आम्ही १४ – १५ जण एकत्रच मुंबईत आलो, अशी आठवण सांगून संदीप म्हणाले, “तो जागतिकीकरणाचा आणि सर्व प्रकारच्या स्थित्यंतराचा काळ होता. २००१ च्या सुमारास मोबाईल प्रचलीत नव्हते. आम्ही पेजर वापरत असू. निर्माते, दिग्दर्शकांना स्वतःची माहिती – फोटो नेऊन काम मागत असू. अशा वेळी योगायोगाने मला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘सर आली धावून’ या नाटकात संधी मिळाली. सतीश तारे, प्रशांत दामले यांच्याकडून खूप शिकता आले. नाटक, चित्रपट आणि मालिका या वेगवेगळ्या माध्यमांत काम करताना चित्रपटाची दृष्यभाषा आणि तंत्रभाषा तसेच कॅमेरा आणि प्रकाश, यांचे बारकावे शिकता आले. ज्येष्ठ कलाकारांकडून त्या त्या माध्यमांवरील पकड समजली.”
पाठक पुढे म्हणाले, “मला लोकांना हसवायला आवडते. मी रंगमंचावर उभा राहिलो, की पहिल्या १० मिनिटांत मला प्रेक्षकांमधील लहान मूल जागे करून, त्याला दोन तास सर्व काही विसरून हसवायला आवडते. मला राजा गोसावी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याची चरित्र भूमिका साकारायला आवडेल’, असेही ते म्हणाले,
प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘व-हाड निघालंय लंडनला’ चे शिवधनुष्य मी उचलले, ते माझ्यातील नटाला आव्हान म्हणूनही आणि त्या सादरीकरणाच्या अतीव प्रेमापोटीही. मी व-हाडचा नुकताच ५६५ वा प्रयोग केला. आजही प्रयोगाला उभा राहिलो, की आधी दडपण जाणवते’, असे ते म्हणाले. यावेळी संदीप पाठक यांनी ‘व-हाड निघालय लंडनला’ या नाटकातील काही भागही सादर केला.