पुणे(प्रतिनिधी)– नेतृत्वाच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी राज्यात मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात हेतुपुरस्सर वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) केला आहे. हा डाव लक्ष्मण हाकेसारख्या (Laxman Hake) लोकांकडून होत आहे. अशा बेताल वक्तव्ये करून वातावरण दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत, मोर्चाने शासनाकडे मराठा समाजाच्या (Maratha Community) तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या (Other Backward Class Students) शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठीच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा अशी मागणी पत्राकर परिषदेत सोमवारी केली.
या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समनव्यक राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare), राजेंद्र कुंजीर (Rajendra Kunjir), डॉ. धनंजय जाधव (Dr. Dhananjay Jadhav), सचिन आडेकर (Sachin Adekar), तुषार काकडे (Tushar Kakade), राष्ट्र समूह सेवाचे राहुल पोकळे (Rahul Pokale), अश्विनी खाडे पाटील (Ashwini Khade Patil), भाग्यश्री बोरकर (Bhagyashree Borkar) यांसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सारथी संस्थेला (SARATHI) मिळालेल्या निधीवरून महाज्योतीबाबत (MAHAJYOTI) भेदभाव केल्याचा दावा करत, काही व्यक्ती व विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेले जलसमाधी आंदोलन हे केवळ “स्टंट” होते. राज्याच्या मागासवर्ग आयोगाची आणि शासनाची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचे मोर्चाचे म्हणणे आहे. लक्ष्मण हाके यांच्यासारख्या व्यक्तींकडून राज्यात निरनिराळ्या जाती-जमातींमध्ये तणाव निर्माण करणारी वादग्रस्त वक्तव्ये केली जात असून, यामुळे एकूणच सामाजिक वातावरण खराब होत आहे, याकडे मोर्चाने लक्ष वेधले आहे.
सारथी संस्थेची निर्मिती व महत्त्व
मराठा क्रांती मोर्चाने सारथी (SARATHI) संस्था आपल्याच मागणीतून स्थापन झाली आहे असे म्हटले आहे. सारथी संस्थेमुळेच पुढे महाज्योती (MAHAJYOTI) आणि अमृत (AMRUT) या संस्थांची निर्मिती झाली. या तीनही संस्थांच्या निर्मिती अहवालात मोलाचे योगदान देणाऱ्या श्री. डी. आर. परिहार (Mr. D. R. Parihar) यांनी कोणतेही मानधन घेतले नाही, ही बाबही मोर्चाने निदर्शनास आणली आहे.
अपमानकारक वक्तव्यांवर कठोर कारवाईची मागणी
राष्ट्रपुरुष (National Leaders) आणि समाजपुरुषांविषयी (Social Leaders) अपमानकारक वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर शासनाचे नियंत्रण नसल्याचा मुद्दाही उपस्थित करत, अदखलपात्र गुन्हे दाखल करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने असे लोक मोकाट फिरत असल्याचे मोर्चाने म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये चौकशी करून कठोर ‘पोलिसी उपचार’ करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून कायदा व नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना वचक बसेल.
धनगर आरक्षणाचा मुद्दा व ओबीसी योजना
धनगर समाजाला (Dhangar Community) लागू असलेल्या सर्व योजना ओबीसी प्रवर्गासाठी लागू कराव्यात, अशी मागणीही मोर्चाने केली आहे. त्याचबरोबर, मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणास (OBC Reservation) विरोध करणारे, कुणबी प्रमाणपत्रास (Kunbi Certificate) विरोध करणारे आणि एसईबीसी आरक्षणास (SEBC Reservation) विरोध करणारे घटक सारथी संस्थेसदेखील भेदभाव करण्याच्या दृष्टीने पाहत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे.
संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि उपाययोजना
पीएचडी (PhD) करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत, महिन्याला ५०,०००/- रुपये मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाचे वित्तीय नियम डावलून फेलोशिपसाठी नोंदणी दिनांकापासून पैसे देण्याची मागणी करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अर्धी फी भरता न आल्याने किंवा एसटी पाससाठी पैसे नसताना लातूर (Latur) आणि मराठवाड्यातील (Marathwada) विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनांचा उल्लेख करत, शासकीय योजना खऱ्या गरजूंना मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.
संशोधक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देताना, मोर्चाने म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांचे संशोधन दिरंगाईने चालले आहे, त्यांचे मानधन सहा महिन्यांसाठी गोठवावे आणि प्रगती केल्यानंतरच ते पुन्हा सुरू करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने वर्षातून किमान दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये (वेब जर्नल; स्प्रिंगर, युजीसी केअर लिस्ट, (UGC CARE List) प्रकाशित करणे बंधनकारक करावे, जेणेकरून त्यांच्या संशोधनाचा समाजाला, राष्ट्राला आणि राज्याला उपयोग होईल. तसेच, संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित संशोधन केंद्रांमध्ये उपस्थित राहून काम करावे, जेणेकरून संस्था पांढरा हत्ती ठरू नयेत आणि त्यातून सक्षम पिढी घडावी.
मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) शासनाला आवाहन केले आहे की, सर्वच योजनांचा आढावा घेऊन, ज्यामध्ये जास्त संधी आहेत अशा योजनांना चालना द्यावी आणि सामाजिक न्यायाच्या वंचितांची ही लढाई यशस्वी करावी.