टॅग: #वी फाऊंडेशन
वी फाऊंडेशन आणि एरिक्सनच्या वतीने वंचित विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक लॅब सुरु
पुणे : चौथ्या औद्योगिक क्रांतीची नांदी सुरु झाली आहे. भविष्यातील आपले मनुष्यबळ केवळ डिजिटल युजर बनून न राहता डिजिटल मेकर बनावे यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यासाठी तयार असलेले कुशल प्रतिभावंत निर्माण होण्याची सुरुवात शालेय स्तरापासूनच व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, वी चा सीएसआर विभाग वी फाऊंडेशनने एरिक्सन इंडियाच्या सहयोगाने पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सयाजीनाथ महाराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्याधुनिक रोबोटिक लॅब सुरु केली आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मिळून दहा रोबोटिक लॅब्स तयार करण्याचे वी फाऊंडेशनने ठरवले आहे आणि त्यापैकी पहिली लॅब आज पुण्यात सुरु करण्यात आली.
या डिजिटल लॅबचे औपचारिक उद्घाटन एरिक्सनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ कस्टमर युनिट, वेस्ट इंडिया अमरजीत सिंग यांनी केले. यावेळी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे क्लस्टर बिझनेस हेड - महाराष्ट्र व गोवा रोहित टंडन उपस्थित होते.
यावेळी वी फाऊंडेशनने एका ग्रंथालयाचे देखील उद्घाटन केले आणि आपल्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील निवडक विद्यार्थ्यांचा सत्कार केला.