पुणे – मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या २५ जुलै या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधुन लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई’ हे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित झाले आहे.बाबूजींच्या सुरेल कृष्णधवल काळाचा वेध घेणारे हे कृष्णधवल पुस्तक रसिकांसाठी उपलब्ध झाले आहे .’रीडिफाईन कॉन्सेप्ट्स ‘ने ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लेखक असलेल्या योगेश देशपांडे यांनी चित्रकार म्हणूनदेखील भूमिका बजावली असून ३० हुन अधिक रेखाचित्रे या पुस्तकात रेखाटली आहेत !
गेली अनेक वर्ष योगेश देशपांडे यांनी बाबूजींच्या जीवनप्रवासाचा घेतलेला शोध, काही वैयक्तिक आठवणी, काही प्रासंगिक घटना विविध कार्यक्रमानिमित्त भेटलेल्या दिग्गज लोकांकडून संकलित केलेले अनुभव, यांचे लघुकथा स्वरूपातील हे आकर्षक पुस्तक तयार होऊन रसिकांच्या भेटीस आले आहे.
योगेश देशपांडे म्हणाले ,’बाबूजींच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगाना लिहिताना मी माझ्या नजरेतून ते पाहत होतो, कारण माझ्या व्यक्त होण्याला चित्ररुपी प्रभावी माध्यम हातात होतं. म्हणूनच कि काय बाबूजींचे सर्व प्रसंग मला प्रत्यक्ष जगायला मिळत होते. त्यामुळे स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्रचित्र शोध घेण्याचा हा अनुभव खऱ्या अर्थानं त्यावरील रेखाचित्र काढली तेव्हा गडदपणे जाणवला.बाबुजींच्या प्रेमापोटी, त्यांच्या गाण्यांवर असलेल्या निर्विवाद आनंदापोटी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेपोटी खर तर हे पुस्तक करण्याचं ठरवलं आणि” देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई ” सारखं एक देखणं चित्र -चरित्र वेध घेणारे पुस्तक निर्माण झाले
‘हे पुस्तक करण्यासाठी प्रेरणा मिळाली ती दोन घटनांच्या निमित्ताने . एक म्हणजे त्यांच्या ‘ सावरकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी बाबूजींची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर आलेला 1998 सालचा अनुभव, आणि मी स्वतः 2016 साली भारतीय सैन्यातील जायबंदी जवानांसाठी जाहिरात मोहिम करीत असताना जाणवलेली देशभक्तीची अनेक रूपे. ज्या निमित्ताने गायक संगीतकार म्हणून आवडणारे सुधीर फडके, निस्सीम देशभक्त असलेले सुधीर फडके अधिक खुणावत गेले’,असेही योगेश देशपांडे म्हणाले.
15 ऑगस्ट 2016 साली बाबूजींच्या आयुष्याचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय पक्का केला होता.लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निवेदन अश्या अनेक निमित्ताने बाबूजींच्या गाण्यावर असलेली श्रद्धा आणि प्रेम एका बाजूला होतेच, मात्र त्यांनी केलेल्या या अफाट कामामागच्या कष्टाची दुसरी बाजू समजून घ्यावी अशी होती,असेही देशपांडे यांनी सांगितले .
जेष्ठ दिग्दर्शक राम गबाले, बाबा पाठक, आनंद माडगूळकर, श्रीधर फडके यांच्यासह विविध कार्यक्रम करत असताना, बाबूजींचे अनेक पैलू, आठवणी, घटना प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्या हे खर तर मी भाग्य समजतो असे योगेश देशपांडे आवर्जून सांगतात.
नव्या पिढीला एक यशस्वी कलाकार कसा घडतो हे सांगून, त्यांच्या अनुभव विश्वातून काही नवे शिकायला मिळाले तर कदाचित नवी प्रेरणा मिळेल. आणि नवं तरुणांना संगीत क्षेत्रात काहीही नवीन करताना, त्या कला निर्मितीचा दर्जा अधिक उंचावताना मदत होईल या प्रेरणेतून हे पुस्तक घडले आहे . बाबूजींच्या १०२ व्या जयंती निमित्त प्रकशित होणाऱ्या या पुस्तकाचे स्वागतमूल्य १०२ रुपये असेच ठेवण्यात आले आहे .