पुणे-आपल्या आवडत्या पुस्तकांचा श्रवणीय आनंद देणार्या व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्सची परिसंस्था उभारणार्या स्टोरीटेलला (storytel) २०२२ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून पुस्तकांशी, पॉडकास्टशी नातं जोडून देणार्या स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांनी २७ नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतात स्टोरीटेलची सेवा सुरू केली.
आपल्या पाच वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलताना योगेश दशरथ म्हणाले की,पाच वर्षांपूर्वी भारतात ऑडिओबुक्सबाबत फारशी माहिती नसल्याने स्टोरीटेल अॅप सुरू करण्याची कोणतीच योजना नव्हती. मात्र संशोधन, अभ्यास,तांत्रिक बाजू, माहितीचा पाठपुराव्यानंतर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायचे आम्ही ठरविले. भारतात हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तीनही भाषांत काम सुरू करून एका अर्थाने स्टोरीटेलने भारतीय स्थानिक भाषांमध्ये ऑडिओबुक्स निर्मितीची पायाभरणी केली असे म्हणता येईल.नंतर हळूहळू भारतीय भाषांतील सर्वोत्तम ऑडिओबुक्स असणारे अॅप म्हणून स्टोरीटेल भारतात नावारूपाला आले आणि भारतीय भाषांतील सर्वोत्तम साहित्य आंतरराष्ट्रीय डिजीटल व्यासपीठावर नेण्याचे योगदान या निमित्ताने झाले.
सुरूवातीला मराठी, हिंदी, इंग्रजीतील साहित्य प्रकाशित करण्यावर भर होता पण हळुहळू मल्याळम, तमिळ, बंगाली, गुजराथी, उडिया, आसामी, कन्नड अशा सर्वच महत्वाच्या भारतीय भाषांतील सर्वोत्तम साहित्य ऑडिओबुक्स स्वरूपात स्टोरीटेलने आणायला सुरूवात केली. यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व दर्जेदार भारतीय साहित्य दर्शन घडवण्याचे योगदान स्टोरीटेलने केले आणि त्यामुळे साहित्य व मनोरंजन क्षेत्रात स्टोरीटेलची दखल मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली.
ते पुढे म्हणाले की, भारतीय भाषांतील सर्वोत्तम साहित्याचे हक्क प्राप्त केल्यावर त्यांना साजेशी दर्जेदार निर्मिती करण्यासाठी स्टोरीटेलने विशेष प्रयत्न केले. प्रत्येक भाषेतील नामवंत कलावंतांना त्यांच्या आवडीची सर्वोत्तम पुस्तके वाचण्याची विनंती केली. आपल्या भाषेच्या प्रेमापोटी आणि अभिनय करताना मिळवलेल्या वाचिक अभिनयाच्या कौशल्याचा वापर करता येईल या उद्देशाने अनेक नामवंतांनी आपले आवाज ऑडिओबुक्ससाठी दिले. नामवंत अभिनेत्यांना स्टोरीटेलसाठी ऑडिओबुक्स वाचण्यासाठी प्रेरीत करणे आणि उत्तम साहित्य उत्तम आवाजात उपलब्ध करून देणे आणि ऑडिओबुक हे माध्यम म्हणून लोकप्रिय करणे हे एक मोठे योगदान स्टोरीटेलनी केले आहे.
स्टोरीटेलने गेल्या पाच वर्षांत ऑडिओ क्षेत्रातील उद्योजकता निर्माण करून एक महत्वाची परिसंस्था (इको सिस्टीम)विकसित केली ज्यामध्ये ऑडिओ स्टुडिओज, साऊंड रेकॉर्डीस्टस, नॅरेटर्स, प्रूफ लिसनर्स, मुखपृष्ठांसाठी चित्रकार, लेखक, संपादक, ध्वनी दिग्दर्शक, संगीतकार अशा अनेकांना व्यवसाय मिळाले व ही परिसंस्था स्थानिक भारतीय भाषांमध्ये निर्माण झाल्याने मुद्रीत माध्यमातील प्रकाशकांनी इबुक्स सोबतच ऑडिओबुक्सही प्रकाशित करायला सुरूवात केली. स्टोरीटेलने या सर्व प्रकाशकांसोबत कंटेंट डिस्ट्रिब्युशन करार करून त्यांची ऑडिओबुक्स स्टोरीटेल अॅपवर उपलब्ध करून दिली.