पुणे(प्रतिनिधि)–राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. पुणे जिल्हृयातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी हे नेते उद्या (शुक्रवारी) चार वाजता एकत्र येणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षात फूट पडल्यानंतर हे नेते शरद पवारांबरोबर कुठल्या कार्यक्रमाला दिसलेले नव्हते. मात्र, शुक्रवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, या निमित्ताने शरद पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील एका मंचावरती येणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याच्या वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेले नाही, त्यानंतर त्यांनी अजित पवारांवरती थेट टीका केली आणि तरी देखील अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नसल्याची चर्चा होती, त्यानंतर छगन भुजबळ परदेशात गेले होते. आज (गुरुवारी) ते पुन्हा भारतात परतले. उद्या शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एका मंचावरती दिसणार आहेत, त्यामुळे ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा पहिला कार्यक्रम हा सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत, त्याच वेळी तिथे छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे. मात्र, तो कार्यक्रम झाल्यानंतर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या सोबतच्या दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी छगन भुजबळ शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.