sharad pawar active in baramati : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर आणि त्यांच्या अस्थींचे आज विसर्जन झाल्यानंतर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक कामात सक्रिय होत बारामतीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. अस्थींचे आज विसर्जन झाल्यानंतर त्यांनी प्रदूषित नीरा नदीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नदीच्या पाण्याची दयनीय अवस्था पाहून संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.पुतण्याच्या निधनामुळे काही काळ खचलेले आणि भावूक झालेले पाहायला मिळालेले शरद पवार आता पुन्हा एकदा सार्वजनिक कामात सक्रिय झाले आहेत.
अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा स्थानिक कारभार अजित पवारांकडे सोपवून स्वतःला देशाच्या राजकारणात झोकून दिले होते. तेव्हापासून बारामतीचे सर्व प्रश्न अजित पवारच सोडवत असत, मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामती पोरकी झाल्याची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, पवार कुटुंबीयांनी बारामती जवळील सोनगाव येथे अस्थी विसर्जन केल्यानंतर शरद पवार थेट बारामती शेजारील नीरा वाघज गावात पोहोचल,. तिथे त्यांनी प्रदूषित नीरा नदीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नदीच्या पाण्याची दयनीय अवस्था पाहून संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
नीरा नदीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतजमिनी खारपट व पांढऱ्या पडत असून मजुरांना दूषित पाण्यामुळे त्वचेचे विकार जडत असल्याच्या तक्रारी यावेळी ग्रामस्थांनी मांडल्या. शरद पवारांनी या पाहणी दरम्यान माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या ईटीपी आणि एसटीपी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच, डेअरी आणि कत्तलखान्यांचे प्रक्रिया न केलेले पाणी थेट नदीत सोडू नये, यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या आणि नवीन प्रकल्प राबवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या,.
दुसरीकडे, अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राजकीय पोकळीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन विधानसभा लढवावी, अशी मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे,. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. शरद पवारांनी स्वतः प्रत्यक्ष मैदानावर उतरून कामाला सुरुवात केल्यामुळे बारामती आणि त्यांचे जुने नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, त्यांनी पुन्हा एकदा तालुक्याची धुरा आपल्याकडे घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.













