पुणे- सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी परिसरातील रेडी मिक्स क्रॉंंकीट (आरएमसी) प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवालदिल झालेल्या या भागातील रहिवाशी गेल्या पाच वर्षांपासून हे प्लांट बंद करावे यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांना ना शासन स्तरावर ना लोक प्रतिनिधिंकडून प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही थेट प्लांट बंद करण्याबाबत हतबलता दर्शविल्याने या भागातील श्वसनाच्या त्रासाने ग्रासलेल्या नागरिकांना कोणीच वाली नाही अशी स्थिति निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रत्येकवेळी नागरिकांचा उद्रेक होऊन काहीतरी विपरीत घडल्यानंतरच प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन लक्ष देणार का? अशी संतप्त भावना या भागातील राहिवाश्यांनी व्यक्त केली आहे.
‘प्रयेजा सिटी’ परिसरात दहाहून अधिक आरएमसी प्लांट आहेत. आरएमसी प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर सिमेंटयुक्त धूळ पसरत असून, त्यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. परिणामी, नागरिकांना श्वसनाचे विकार, अस्थमा, त्वचारोग आणि डोळ्यांचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘या परिसरात गेल्या काही महिन्यांत दमा आणि श्वसनासंबंधी तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. धुळीच्या सततच्या संपर्कामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, आणि डोळ्यांची जळजळ यासारख्या समस्या दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर या प्लांटमुळे या भागात सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल आणि सिमेंट मिक्सरची अवजड वाहनांच्या वर्दळीमुळेही रस्त्यांवरही सिमेंटचे थर जमा झालेले असतात. त्याचाही त्रास रहिवाशांना होतो.
दरम्यान, या भागातील रहिवाशी गेली पाच वर्षे विविध मार्गांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, लोकप्रतिनिधी यांच्याकडे यासंबंधी दाद मागता आहेत. अगदी लोकप्रतिनिधींना सांगून, मोर्चे काढूनही त्यांना कोणी दाद देत नाहीये.
प्रदूषण नियंत्रण मंडळही हतबल
या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आज (दि. ९ एप्रिल २०२५) या भागातील रहिवाशांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंके, उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे हे उपस्थित होते.
यावेळी या अधिकाऱ्यांना या भागात सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी परिसरातील रेडी मिक्स क्रॉंंकीट (आरएमसी) प्लांटमुळे कसे प्रदूषण होते, याबाबत कधी पाठपुरावा केला याबाबतचे सादरीकरण केले. दरम्यान, या भागात आपण स्वत: भेट देऊन पाहणी केल्याचे साळुंके यांनी सांगितले. बंद करण्याच्या नोटीस देऊनही प्लांट सुरू का आहेत? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मात्र त्यांनी आम्ही महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला या प्लांटचा वीज पुरवठा बंद करावा, तसेच महानगरपालिकेला प्लांट बंद करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. महसूल विभाग आणि तहसीलदारांनाही पत्र दिले आहे. मात्र, तेही लोक शांत राहतात. मात्र, एवढेच आमच्या हातात आहे असे उत्तर दिले. आमचे अधिकार एवढेच आहे असे त्यांनी सांगितले. तसेच हे प्लांट बंद न करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप असल्याचेही अप्रत्यक्षपणे सांगून त्यांची हतबलता व्यक्त केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपयोग काय?
प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास होत असताना अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला जर थेट प्लांट बंद करण्याचे अधिकार नसतील तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपयोग काय असा संताप यावेळी उपस्थित राहिवाश्यांनी व्यक्त केला. मात्र, आम्ही एवढेच करू शकतो असे सांगून साळुंके यांनी त्यांची हतबलता व्यक्त केली.
यामागचे ‘आका’ कोण?
एरवी एखाद्या सामान्य नागरिकाने एखादी गोष्ट केली आणि त्याबाबत कोणी तक्रार केली तर त्याच्यावर कारवाईचा बडगा त्वरित उगारला जातो. मात्र, अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून, विविध वृत्तपत्रांमध्ये यासंबंधी सविस्तर बातम्या आलेल्या असताना महापालिका, प्रशासन, लोकप्रतिनिधींना हा आक्रोश ऐकू येत नाही अथवा दिसत नाही का? राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कारवाईच्या नोटिस देऊनही राजरोसपणे सिमेंट क्रॉंकीट प्लांट सुरू आहेत याचा अर्थ यामागे सर्वांचेच काही आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत हे सांगण्यासाठी कुणा तज्ञाची आवश्यकता नाही. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकरणे समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील प्रकरण ताजे आहे. अशा प्रकारचे ‘आका’ सर्वांच भागात आहेत. मात्र, गेड्यांची कातडी पांघरलेले वीज वितरण कंपनीचे अधिकारी, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, प्रशासन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे ते ‘आका’ कोण असा सवाल रहिवाशी विचारत आहेत.