पुणे(प्रतिनिधि)–स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी बुधवारी पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत नव्या पक्षाची घोषणा केली. ‘महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी’ असं त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. दरम्यान, रविकांत तुपकरांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या २५ जागा लढवणार आहे. यामध्ये : बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा समावेश आहे.
रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची आणि आगामी धोरणांबाबत घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून मला वेगळं केलं हे ऐकून मला धक्का बसला. संघटनेसाठी मी अनेकदा जेल मध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. असं असतानाही राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली ते ऐकून मला धक्का बसला. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नाव रूपाला आली आणि माझी गरज संपली अशी खंत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. आज आम्ही ४ तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि काही महत्वपूर्व निर्णय घेतले. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना करत आहोत असं तुपकर यांनी सांगितले.
तुपकर म्हणाले, राजू शेट्टी यांची एक स्टाईल असून स्वत: काही करायचे नाही व दुसऱ्याचे खांद्यावर बंदुक ठेवयाची. आम्ही २० ते २२ वर्ष तुमच्यासोबत असून तुमच्या खेळया आम्हाला माहिती आहे ते न समजण्या इतके आम्ही दुधखुळे नाही. स्क्रिप्ट त्यांची असून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर असे वागत असेल तर नवीन कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल. राज्यातील २७ जिल्हयातील प्रतिनिधी आज माझ्यासोबत बैठकीस आले. शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्यासोबत आलेले आहेत. प्रत्येक चळवळीचा एक काळ असतो. काळानुरुप नवे नेतृत्व तयार होत असते. शेतकरी चळवळीचे काम नव्या जोमाने पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. मला संघटना सोडायची नव्हती परंतु राजू शेट्टी यांनी मला पक्षाबाहेर काढले. मी पाठवलेल्या मागील वर्षीच्या दहा पानी पत्राबाबत शेट्टी किंवा संघटनेने अद्याप काहीच उत्तर दिले नाही. सोयाबीन, कापूस प्रभावी आंदोलन आम्ही केले परंतु त्यात राजू शेट्टी सहभागी झाले नाही. आम्ही चळवळीचे नुकसान केले नसून चळवळ वाढविण्याचे काम केले. शरद जोशी यांच्यामुळेच राज्याला राजू शेट्टी यांची ओळख झाली असा टोलाही त्यांनी लगावला.
तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी २५ जागांवर निवडणूक लढवेल, यात बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदारसंघाचा समावेश आहे. लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहे तसेच राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. तुपकर यांनी नवीन पक्ष काढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांनी बाहेर पडत रयत क्रांती संघटना स्थापन केली, आता रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना केल्याने राजू शेट्टींपुढे आणखी एक आव्हान उभं राहिले असं म्हणावं लागेल.