पुणे(प्रतिनिधि)— अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तसेच दक्षिण कर्नाटकजवळील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २० ते २३ मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह (ताशी ५०-६० किमी वेग) आणि विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये पुढील ४-५ दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
कोकणासाठी ‘रेड अलर्ट‘ जारी
महाराष्ट्रात येत्या २० ते २५ मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असून, २० मे रोजी दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा (Extremely Heavy Rainfall) इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मासेमार आणि बंदरांना इशारा
समुद्रात वादळी हवामान अपेक्षित असल्याने मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकण किनारपट्टीवर २१ आणि २४ मे रोजी, तर दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर २० ते २४ मे दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ४५ किमी पर्यंत राहू शकतो, जो ५५ किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व बंदरांवर ‘लोकल कॉशनरी सिग्नल क्रमांक ३ (LC III)’ लावण्यात आले आहेत, कारण वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रतितास राहून तो ६५ किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे समुद्र खवळलेला राहील.
संभाव्य परिणाम आणि घ्यावयाची काळजी
या जोरदार पावसामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नागरिकांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी:
- सखल भाग आणि शहरी भागात पाणी साचू शकते किंवा पूर येऊ शकतो.
- कच्चे रस्ते, जुन्या इमारती किंवा कमकुवत झाडे कोसळण्याची शक्यता आहे.
- रस्ते, रेल्वे, हवाई आणि फेरी वाहतूक विस्कळीत होऊ शकते.
- वीज आणि पाणीपुरवठा सारख्या स्थानिक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
- पिकांचे नुकसान आणि जमिनीची धूप होऊ शकते.
- संवेदनशील भागात भूस्खलन, चिखल कोसळणे किंवा दरड कोसळण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन
- प्रवासाला निघण्यापूर्वी रस्त्यावरील परिस्थिती तपासा.
- वाहतूक संबंधित सूचनांचे पालन करा.
- ज्या भागात नेहमी पाणी साचते, तिथे जाणे टाळा.
- जुन्या किंवा कमकुवत इमारतींमध्ये थांबू नका.
- वादळ सुरू असताना खुल्या जागांमध्ये काम करणे टाळा, तसेच उंच झाडे किंवा इमारतीखाली आसरा घेऊ नका.
- विजेची उपकरणे बंद ठेवा आणि पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर राहा.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
- वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेली पिके काढून घ्यावीत.
- तरुण फळझाडे आणि भाजीपाला यांना वाऱ्यापासून संरक्षण देण्यासाठी आधार द्या.
- काढलेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा किंवा धान्य गोदामात हलवावा.
- या काळात पिकांना पाणी देणे किंवा रासायनिक फवारणी करणे टाळावे.
- शेतात पाणी साचू नये यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी.
- जनावरांना सुरक्षित ठिकाणी, गोठ्यात ठेवावे आणि वादळावेळी त्यांना बाहेर सोडू नये.